मुंबई-राष्ट्रवादीतील बंडानंतर आता पक्षाच्या दोन्ही गटांमध्ये आमदार आणि जिल्हाध्यक्षांना आपल्या गोटात ओढण्याची अथवा कायम ठेवण्याची स्पर्धा लागलेली आहे. यासाठी दोन्ही गटांकडून आमदार व जिल्हाध्यक्षांवर दबाव वाढत आहे. यात काही आमदार व जिल्हाध्यक्ष नॉट रिचेबल झाले आहेत. आम्हाला बहुतांशी आमदारांचा व पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा असल्याचा दावा अजित पवार गटाकडून सुरु असला तरी प्रत्यक्षात स्थिती अद्यापही अस्पष्टच आहे.
राष्ट्रवादी पक्षात झालेल्या बंडानंतर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे अर्धे इकडे आणि अर्धे तिकडे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. तर काहींनी सध्या कोणतेही भूमिका न घेत कुंपणावरच राहण्याचा निर्णय घेतला आहे. अजित पवारांच्या गटाकडून जिल्हाध्यक्षांची जमवाजमव सुरू झाली असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील कालपासून नॉट रिचेबल आहेत. ते अजित पवारांच्या गटात जाणार असल्याची चर्चा आहे. शहराध्यक्ष ख्वाजा शरफोद्दीन मात्र शरद पवारांच्या सोबत आहेत.