मुंबई- या वर्षाच्या अखेरीस म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर महिन्यात राज्यातील लांबणीवर पडलेल्या महापालिका निवडणुका होतील, असे संकेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (DCM Devendra Fadnavis on Municipal Corporation Elections) यांनी आज दिले आहेत. निवडणुका आम्ही लांबविलेल्या नाहीत तर उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने अनेक याचिका दाखल केल्यामुळे निवडणुका लांबल्या आहेत, असे स्पष्टीकरणही फडणवीस यांनी वेळी दिले. ऑक्टोबर आणि नोव्हेंबरमध्येच बीएमसी निवडणूक होईल, असेही त्यांनी सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने जैसे थे चे आदेश दिले असल्याने निवडणुका होऊ शकलेल्या नाहीत. तो हटविला गेल्यावर आणि निकाल आल्यावर निवडणुका होतील, असेही ते म्हणाले.
निवडणुका का घेत नाहीत, असे उद्धव ठाकरे विचारतात, त्यावेळी आम्हाला आश्चर्य वाटते. त्यांनी याचिका दाखल केल्या, त्या मागे घेतल्या गेल्यास जैसे थे परिस्थिती राहणार नाही. मात्र, ते दोन्ही बाजूंनी बोलतात. खरे तर ते राज्य सरकारच्या हातात नाही. माझ्या अंदाजाने ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये निकाल येईल आणि निवडणुका देखील होतील, असेही फडणवीस म्हणाले.
महानगर पालिकेच्या निवडणुका आम्ही शिवसेनेसोबत लढणार आहोत, असे स्पष्ट करताना फडणवीस म्हणाले की, पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांनी मुंबई १५० चा नारा दिला आहे. तो कायम असून आम्ही मुंबई चांगल्या पद्धतीने जिंकणार आहोत. हिंदुत्व हा निवडणुकाचा मुद्दा नाही. आम्ही विकासाच्या मुद्यावर मते मागतो. मागील निवडणुकीतही आम्ही मोठी मुसंडी मारली होती, याकडे फडणवीस यांनी लक्ष वेधले.