sharad pawar “तुमचाही दाभोलकर होणार”, शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी!

0

मुंबई  (MUMBAI) : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार (NCP President Sharad Pawar) यांना ट्विटरवरून जीवे मागण्याची धमकी देण्यात आली आहे. या धमकीची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांची भेट घेत धमकी देणाऱ्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शरद पवार यांना ‘तुमचा देखील दाभोळकर करू’ अशी धमकी देण्यात आली आहे. ‘राजकारण महाराष्ट्राचं’ या नावाच्या खात्यावरुन अशा प्रकारची धमकी देण्यात आली असल्याची माहिती आयुक्तांकडे तक्रार करण्यासाठी आलेल्या खासदार सुप्रिया सुळे यांनी माध्यमांना दिली. हे हँडल कुठली व्यक्ती चालवते, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही.

सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, शरद पवारांना मिळालेल्या धमकीचा सखोल तपास केला पाहिजे. महाराष्ट्रात दडपशाही आणि गुंडाराज सुरू आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे न्याय मागत आहे. भविष्यात काही बरे वाईट झाल्यास त्याला जबाबदार देशाचे आणि राज्याच्या गृहमंत्री जबाबदार असतील, असेही त्या म्हणाल्या. राज्य सरकारने लवकरात लवकर तक्रारीची दखल करत कडक कारवाई करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

काय म्हणाले बावनकुळे?

शरद पवारांना आलेल्या धमकीबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, जर कोणी अशी धमकी दिली असेल तर पोलिसांनी त्वरित कारवाई करून अटक करावी.