Home Breaking news नागभीडमध्ये वाघाचा कहर : दोन जणांचा मृत्यू

नागभीडमध्ये वाघाचा कहर : दोन जणांचा मृत्यू

0

तातडीने ठोस उपाययोजनांची गरज – संजय गजपूरे

नागभीड (चंद्रपूर) : नागभीड तालुक्यात चालू महिन्यात वाघाच्या हल्ल्यात दोन व्यक्तींचा मृत्यू झाल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षाच्या पार्श्वभूमीवर वनविभागाने तातडीने ठोस व प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी माजी जि. प. सदस्य व भाजपा नेते संजय गजपूरे यांनी केली आहे.
नागभीड तालुका व परिसरात यापूर्वीही शेतात काम करताना वाघाच्या हल्ल्यात नागरिकांचा मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. जंगलालगत असलेल्या शेतीवर काम करण्यास शेतकरी सध्या घाबरत असून, अनेकांनी शेतात जाणे टाळले आहे. त्यामुळे शेतीकामावरही परिणाम होत आहे.
जिल्ह्यातील आकडेवारीनुसार, चंद्रपूर जिल्ह्यात मागील वर्षभरात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र झाला असून 2025 मध्ये एकूण 47 मृत्यू नोंदवले गेले, त्यापैकी 42 मृत्यू वाघाच्या हल्ल्यात झाले आहेत. याशिवाय बिबट्या, अस्वल आदी वन्य प्राण्यांच्या हल्ल्यातही अनेक नागरिक जखमी झाले आहेत.
या संघर्षामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेवरही परिणाम दिसून येत आहे. मोहफूल (मोहा) संकलन हे स्थानिकांसाठी महत्त्वाचे उत्पन्नाचे साधन असून, वाघाच्या भीतीपोटी अनेकांनी जंगलात जाणे कमी केले आहे. परिणामी, या रोजगारावरही संकट निर्माण होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
मानव-वन्यजीव संघर्ष वाढण्यामागे जंगल परिसरात वाढती मानवी वस्ती, पाण्याची व अन्नाची कमतरता, जनावरांची मुक्त चराई तसेच जंगलात जाणाऱ्यांची वाढती संख्या ही प्रमुख कारणे असल्याचे दिसून येते.
या पार्श्वभूमीवर वनविभागाने संवेदनशील भागात कॅमेरा ट्रॅप व ड्रोनद्वारे निगराणी वाढवावी, वाघांच्या हालचालींबाबत तात्काळ सूचना देणारी यंत्रणा कार्यान्वित करावी, धोकादायक वाघांचे स्थलांतर करावे, तसेच जंगलालगत सोलार फेन्सिंग उभारावी, अशी मागणी गजपूरे यांनी केली आहे. तसेच स्थानिक पर्यावरण क्षेत्रात कार्यरत स्वयंसेवी संस्थांना (NGO) हाताशी घेऊन संयुक्त व परिणामकारक उपाययोजना राबवाव्यात, असेही त्यांनी सुचविले.
याशिवाय वनरक्षकांची गस्त वाढवून मृतांच्या कुटुंबीयांना तातडीने भरपाई देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.
ग्रामस्थांनीही एकट्याने जंगलात न जाणे, सकाळ-संध्याकाळ सतर्कता ठेवणे, वन्य प्राणी दिसल्यास तत्काळ माहिती देणे व समूहानेच शेतात किंवा जंगलात जाणे यांसारख्या बाबींचे पालन करणे आवश्यक असल्याचे आवाहन करण्यात आले आहे.
“नागभीड तालुक्यात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वय साधून तातडीने ठोस उपाययोजना करणे अत्यावश्यक आहे,” असे मत संजय गजपूरे यांनी व्यक्त केले आहे.

 

#Nagbhid #Chandrapur #TigerAttack #HumanWildlifeConflict #MaharashtraNews #BreakingNews #GroundReport #SaveLives #TigerConflict #WildlifeAlert #ForestDepartment #WildlifeCrisis #HumanAnimalConflict #TigerTerror #FarmersSafety #RuralIndia #AgriCrisis #VillageLife #MahaFarmers #GroundReality #StayAlert #PublicSafety #ForestSafety #Awareness #SafetyFirst #BeCareful #IndiaNews #TrendingNow #NewsUpdate #MarathiNews #ShankhnaadNews