ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचं निधन

0

पुणे : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे यांचे पुण्यात निधन झाले. पहाटे झोपेत असतानाच त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यांना उपचारासाठी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे आढळून आले. मृत्यूसमयी त्या ९२ वर्षांच्या होत्या. वयाच्या या अवस्थेतही त्यांचे गायन सुरुच होतो व त्या आज मुंबईला ‘स्वरप्रभा’ या कार्यक्रमात गायन करण्यासाठी जाणार होत्या, अशी माहिती त्यांच्या कुटुंबियांनी दिली. त्यांच्या निधनाने संगीत क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. (Prabha Atre Demise) त्यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात परतल्यानंतरच त्यांच्यावर मंगळवारी अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळते आहे.

शास्त्रीय संगीताच्या किराना घराण्याच्या गायिका असलेल्या प्रभा अत्रे यांना संगीतक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’, ‘पद्मविभूषण’ अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी शास्त्रीय गायनाकडे वळल्या. गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. भारतीय शास्त्रीय संगीत या विषयावर त्यांचा गाढा अभ्यास होता. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी अशा चतुरस्त्र प्रतिभेच्या त्या धनी होत्या.
“प्रभाताईंचे निधन होईल, असे कधीच वाटले नव्हते. त्या चिरतरुण होत्या. त्या गाणे गाताना ९२ वर्षांच्या आहेत, असे कधीच वाटले नाही. संगीतविश्वात त्यांनी मोठं काम केलं होतं. आजच्या काळात त्यांची खूप गरज होती”, या शब्दात ज्येष्ठ ज्येष्ठ शास्त्रीय गायिका आरती अंकलीकर-टिकेकर यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली.
देवेंद्र फडणवीस
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या. फडणवीस म्हणाले, “ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभाताई अत्रे यांच्या अकस्मात निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आणि मनाला वेदना देणारे आहे. किराना घराण्याच्या गायिका प्रभाताई अत्रे यांनी शास्त्रीय गायनातून देशभरातील रसिक नुसता मंत्रमुग्ध केला नाही, तर तो अधिक समृद्ध केला. ठराविक पठडीच्या बाहेर जाऊन गायनासाठी त्या ओळखल्या जात. नाविन्य हे त्यांच्या गायनशैलीचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या स्वरांना तप:श्चर्येचे बळ होते. केवळ गायन नाही तर आपले रसिक जाणकार असावेत, यासाठी त्यांनी लेखन सुद्धा केले. त्यांच्या संगीत सेवेसाठी त्यांना भारत सरकारने ‘पद्मश्री’, ‘पद्मभूषण’ आणि ‘पद्मविभूषण’ अशा तिन्ही पुरस्कारांनी गौरवान्वित केले. गेल्याच महिन्यात २५ डिसेंबर २०२३ ला पुण्यात त्यांना अटल संस्कृति पुरस्कार प्रदान केला, तेव्हा तीच शेवटची भेट ठरेल, अशी कल्पनाही नव्हती. त्यांना भेटणं, त्यांचं गाणं ऐकणं ही कायम विलक्षण अनुभूती असायची. भारतीय शास्त्रीय संगीताला त्यांनी दिलेले योगदान शब्दात मांडणे अशक्य आहे. प्रभाताईंनी भारतीय शास्त्रीय संगीताची सेवा करताना नव्या गायक-गायिकांना घडविण्याचे कार्य केले. भारतीय संगीत त्यांचे कायम ऋणी राहील.”