विष्णूने आंतरराष्ट्रीय दर्जाचे शेफ घडवत पाककलेचा लौकिक वाढवा – नितीन गडकरी
विष्णू मनोहर यांना विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान
कुठल्याही क्षेत्रात यश मिळवायचे असल्यास केवळ विद्वत्ता असून चालत नाही तर त्या विद्वत्तेला हिंमतीची जोड लागते. विष्णू मनोहरने ही हिंमत दाखवली आणि केवळ देशात नाही अमेरिकेतही स्वत:चा डंका वाजविला. त्याच्या या समर्पणामुळेच हे शक्य झाले असून त्यांनी आता स्वत:सारखेच आंतरराष्ट्रीय दर्जाचे युवा शेफ घडवित पाककलेचा लौकिक अधिकाधिक वाढवावा’, असे गौरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रविवारी काढले.
कृषी विकास प्रतिष्ठानद्वारे देण्यात येणारा विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान सोहळा उत्तर अंबाझरी मार्गावरील इन्स्टिट्युशन ऑफ इंजिनीअर्सच्या सभागृहात झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. व्यासपीठावर सत्कारमूर्ती सेलिब्रेटी शेफ विष्णू मनोहर, कार्यक्रमाचे अध्यक्ष मेंदूरोगतज्ज्ञ पद्मश्री डॉ. चंद्रशेखर मेश्राम, ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे, गिरीश गांधी, श्रीराम काळे, राजेश गांधी, अॅड. निशांत गांधी, नीलेश खांडेकर आदींची उपस्थिती होती. नितीन गडकरी यांच्या हस्ते विष्णू मनोहर यांना विदर्भ गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्काराचे स्वरूप रोख एक लाख रुपये, शाल, श्रीफळ आणि सन्मानचिन्ह असे आहे.
डॉ. चंद्रशेखर मेश्राम म्हणाले,‘गडकरींनी माझा बरेचदा वेगवेगळ्या कार्यक्रमांमध्ये सत्कार केला आणि त्यानंतर मला पद्मश्री मिळाले, असा इतिहास आहे. आज ते विष्णू मनोहर यांचा सत्कार करताहेत. त्यांनादेखील लवकरच पद्मश्री मिळेल, अशी अपेक्षा आहे.’ अशोक वानखेडे म्हणाले,‘विष्णू मनोहर यांच्या केवळ हातालाच चव नाही; तर ते एक रसिक, गायक, वाचक आणि माणून म्हणूनही उत्तम आहे.’
प्रास्ताविकपर भाषण करताना गिरीश गांधी म्हणाले,‘विष्णूच नव्हे तर संपूर्ण मनोहर कुटुंबीय हे कलागुणांच्या आविष्काराने परिपूर्ण आहे. स्वयंपाक करणारी व्यक्ती कुठकुठले विक्रम करू शकते याचे उत्तम उदाहरण म्हणजे विष्णू मनोहर आहे.’ पाककलेच्या क्षेत्रात आजवर केलेले २६ विक्रम असो वा अमेरिकेत सुरू होणारे पाचवे रेस्टॉरंट असो. हे सर्व माझ्या एकट्याचे काम नाही. यामागे माझे कुटुंबीय, माझे सहकारी यांचा भक्कम पाठींबा आहे. आज मिळत असलेला पुरस्कार सर्व शेतकरीबांधवांना समर्पित आहे, अशी भावना पुरस्काराला उत्तर देताना विष्णू मनोहर यांनी व्यक्त केली.
सूत्रसंचालन रुपाली मोरे यांनी केले. आभार श्रीराम काळे यांनी मानले. कार्यक्रमाला कांचन गडकरी, मनोहर कुटुंबातील सदस्य आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.