
vijay wadettiwar, harshvardhan sapkal, nana patole
विशेष प्रतिनिधी/ मुंबई : विधानसभा निवडणुकीतील काँग्रेसच्या पराभवाची जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी प्रदेशाध्यक्ष पदाचा दिलेला राजीनामा पक्ष श्रेष्ठींनी गुरुवारी मंजूर केला. पटोले यांच्या जागेवर माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड झाल्याचे संकेत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दिले आहेत.
विजय वडेट्टीवारांकडे नवी जबाबदारी
विधानसभा निवडणुकीपासून प्रलंबित असलेल्या महाराष्ट्रातील नियुक्त्या अखेर काँग्रेस पक्षाने आज (ता. 13फेब्रुवारी) जाहीर केल्या आहेत. त्या मागील अडीच वर्षांपासून विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सांभाळणारे विजय वडेट्टीवार यांच्याकडे काँग्रेस पक्षाने आणखी एक महत्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेसमधील वडेट्टीवार यांचे महत्व पुन्हा एकदा अधोरेखित होते. माजी विरोधी पक्षनेते असलेल्या विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांची काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र विधीमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड केली आहे. गेली पाच वर्षांपासून हे पद संगमनेरचे आमदार आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्याकडे होते. मागील खेपेला विरोधी पक्षनेतेपदाची इनिंग खेळणारे वडेट्टीवार यांच्याकडे आता विधीमंडळ पक्षनेतेपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.
नाना पटोलेंचा राजीनामा मंजूर
विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपला राजीनामा पक्ष श्रेष्ठींकडे सादर केला होता. आता त्यांचा राजीनामा मंजूर झाला असून त्यांच्या जागेवर काँग्रेसचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांची नियुक्ती झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदी संस्था नसलेल्या आक्रमक नेत्याची निवड करावी, अशी राहुल गांधी यांची सूचना होती. त्यानुसार हर्षवर्धन सपकाळ यांचे नाव निश्चित झाले असून त्यांच्या नावाची लवकरच अधिकृत घोषणा केली जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांच्या अत्यंत निकट असून बुलढाणा येथील माजी आमदार आहेत.
हर्षवर्धन सपकाळ काँग्रेसचे नवे प्रदेशाध्यक्ष
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव, राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे. राहुल गांधी यांनी स्थापन केलेल्या कार्यगटाचे देखील ते सदस्य होते. राजीव गांधी पंचायत राज संघटनेसह उत्तराखंड, पंजाबसह अनेक राज्यांच्या निवडणुकीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. अभ्यासू व आक्रमक आमदार म्हणून त्यांची ओळख आहे. जिल्हा परिषदेचे सदस्य ते आमदार असा त्यांचा राजकीय प्रवास आहे.
एनएसयुआय, युवक काँग्रेसमध्ये त्यांनी काम केले आहे. मुकूल वासनिक यांच्या माध्यमातून ते राहुल गांधी यांच्या संपर्कात आले. वऱ्हाडासह संपूर्ण राज्यात त्यांनी युवक काँग्रेसची मजबूत बांधणी केली होती. २०१७ मध्ये गुजरात निवडणुकीची मोठी जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.
राजकीय प्रवास
युवावस्थेपासूनच गाडगे महाराज, तुकडोजी महाराज व गांधीवादी – सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून परिचित आहेत. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी पंचायत राज संघटनचे विद्यमान अध्यक्ष आहेत. भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना (nsui) च्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रीय झाले. महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी.कॉम व बी. पी.एड पदवी धारण केलेली आहे. शेतकरी कुटूंबातून आलेले असून सामाजिक कार्य व राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. ग्राम स्वराज्याच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्रात सुरू केलेल्या संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियानांतर्गत त्यांनी विशेष योगदान दिले आहे. ग्रामस्वच्छता तथा आदर्श ग्राम निर्माण या क्षेत्रातील त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे. युवकांसाठी युवक शिबिराच्या नियमित सातत्याने आयोजन, ही त्यांची वैचारिक प्रतिबध्दता दर्शविते. तसेच ही एक फार मोठी उपलब्धी समजली जाते. शेती स्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्तीसाठी त्यांनी आपल्या विधानसभा मतदार संघात केलेला जलवर्धन प्रकल्पाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन तथा जलसंधारण क्षेत्रात त्यांनी विशेष उल्लेखनीय कार्य केले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी तथा आदिवासी गावांचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या २५ वर्षांपासून सातत्याने प्रयत्नशील तथा कटीबध्द आहेत. 1999 से 2002 या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती, हे येथे विशेष उल्लेखनीय. तसेच २०१४ ते २०१९ या कालावधीत ते बुलढाणा विधान सभा मतदार संघात विधान सभा सदस्य म्हणून राहिले आहेत. अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस च्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सद्यस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन म्हणून कार्यरत आहेत. तसेच यापूर्वी राष्ट्रीय सचिव, अ.भा.काँ.कमेटी नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष, राजीव गांधी पंचायत राज संगठन ही जबाबदारी सुध्दा पार पाडलेली आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदार संघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव-वस्ती-वाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे.
काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाब चे सहप्रभारी म्हणून सुध्दा काम केले आहे. तसेच तत्पूर्वी गुजरात व मध्यप्रदेश या राज्यांचे सुध्दा सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. अ.भा.काँ.कमिटी द्वारा सेवाग्राम-वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचार दर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपविलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीतारित्या पार पाडलेली आहे. यासोबतच विविध राज्यातील विधान सभा निवडणूकीत उमेदवार निवडीसाठी पक्षाने स्थापित केलेल्या स्क्रिनिंग कमिटीचे सुध्दा ते सदस्य राहिलेले आहेत.
एकविसाव्या शतकातील वैश्विक मित्रता अभियान अंतर्गत जपान इंटरनॅशनल कॉर्पोरेशनच्यावतीने 1996 मध्ये जपान या देशांमध्ये आयोजित आंतरराष्ट्रीय युवा परिषदेसाठी त्यांनी 20 भारतीय युवक प्रतिनिधी मंडळाचे नेतृत्व केलेले आहे.