
सातारा, 11 फेब्रुवार – श्री समर्थ सेवा मंडळाच्या वतीने समर्थ पादुकांचा प्रचार व प्रसार दौरा नुकताच पुणे परिसरातून पूर्ण करून या पादुका सध्या सातारा शहरातील राजवाडा परिसरातील समर्थ सदन सांस्कृतीक केंद्र येथे वास्तव्यास आहेत . 15 फेब्रुवारीपर्यंत या पादुकांच्या दौऱ्यामध्ये विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रम समर्थ सेवा मंडळाने आयोजित केले आहेत. या उपक्रमांतर्गत सुप्रसिद्ध कीर्तनकार समर्थ भक्त मकरंदबुवा रामदासी यांचे सुश्राव्य कीर्तन ऐकण्यासाठी सातारकरांची मोठी गर्दी होत आहे. मकरंद बुवा रामदासी यांनी आपल्या कीर्तनमालेत पूर्वरंगासाठी मनुष्य देहाच्या सप्त वासनांचे निरूपण पुढे घेतले आहे. माणसाला वासनेने ग्रासलेले आहे, समर्थ रामदास स्वामींनी त्या कोणकोणत्या वासना आहेत आणि त्या सात प्रकारच्या आहेत. त्याचे सुरेख वर्णन आपल्या वाङ्मयातून केले आहे. याचे निरूपण करताना मकरंद बुवा रामदासी यांनी.. धरी धीर राहे स्थिर अरे, तू मना रे क्षणभरी तरी आठवी आता रघुनंदना रे ..हा अभंग निरूपणासाठी घेतला होता. पुढील किर्तन सोहळ्यामध्ये मकरंद बुवा आहे संत तुलसीदास, पुराणातील काही आख्यान व दोन ते तीन दिवस समर्थ चरित्रातील वासना कशी आवरावी याविषयी निरूपण करणार आहेत.
कीर्तन सोहळ्यास सातारकरांची मोठी उपस्थिती असून मकरंदबुवा यांना संवादिनीवर साथ दत्तात्रय डोईफोडे व सुशील गद्रे हे करत असून तबला साथ विश्वास जोशी, पावस यांची आहे. या कीर्तन सोहळ्यात सातारकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून अतिशय सुरेख अशा निरोपणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समर्थ सेवा मंडळाचे वतीने करण्यात आलेले आहे.
दरम्यान, समर्थ रामदास स्वामींच्या पादुका या समर्थ सदन येथे दिनांक 15 फेब्रुवारी दरम्यान सात दिवसाच्या वास्तव्यासाठी आहेत. पादुका दर्शनाचा लाभ सातारकरांनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन मंडळाचे अध्यक्ष ह. भ. प .गुरुनाथ महाराज कोटणीस, कार्याध्यक्ष डॉ.अच्युतराव गोडबोले व कार्यवाह समर्थ भक्त योगेश बुवा रामदासी यांनी केले आहे.
यावेळी ज्या राम भक्तांना समर्थांच्या पादुका आपल्या घरी नेऊन स्वहस्ते पाद्यपूजा करावयाची आहे. त्यांनी समर्थ सदन येथे चौकशी करावी तसेच सात दिवसाच्या या पादुका दौऱ्यामध्ये समर्थ सदन येथे दररोज सकाळी सहा ते सव्वा सहा या वेळेत काकड आरती, सव्वा सहा ते साडेसात यावेळेस समर्थ रामदास स्वामींच्या पादुकांची महापूजा व आरती सकाळी आठ ते बारा या वेळेत सातारा शहरातील विविध प्रभागात सांप्रदायिक भिक्षा फेरी तसेच दुपारी साडेतीन ते साडेचार या वेळेत स्थानिक मंडळांचा भजन कार्यक्रम होऊन सायंकाळी साडेचार ते साडेपाच या वेळेत करुणाष्टके व सवाया तसेच आरती होणार आहे. समर्थांच्या सांप्रदायिक भिक्षा साठी ज्या सातारकर नागरिकांना सांप्रदायिक भिक्षेत गहू ,तांदू,ळ डाळ, साखर, गूळ, पैसे आदि वस्तू अर्पण करून संत सेवेचे पुण्य संपादन करावयाचे आहे ,त्यांनी प्रभागात ज्यावेळी सांप्रदायिक भिक्षा फेरी येईल किंवा समर्थ सदन येथे या शिधावस्तू आणून जमा कराव्यात, याचा वापर सज्जनगडावर होणाऱ्या नित्य अन्नदानासाठी केला जाणार आहे, अशी ही माहिती यावेळी देण्यात आली.