मुंबई MUMBAI -मुंबईतील नागपाडा पोलिस रुग्णालयात Nagpada Police Hospital धक्कादायक प्रकार घडला. पोलिस दलातील एका शिपायाने नागपाडा पोलिस रुग्णालयाच्या प्रसाधनगृहाच्या खिडकीतून उडी टाकत आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या शिपायाचे नाव कैलास गवळी असे असून पोलिसांकडून आत्महत्येचे नेमके कारण जाणून घेण्याचा प्रयत्न सुरु आहे.
पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, गवळी यांची माहिम पोलिस ठाण्यातून सशस्त्र पोलिस दल ३ वरळी येथे बदली दाखवण्यात आली होती. मात्र गवळी हे ८९ दिवस गैरहजर असल्याने त्यांना नागपाडा पोलिस रुग्णालय येथून फिटनेस प्रमाणपत्र आणण्यास सांगण्यात आले होते. रुग्णालयातील डॉक्टरांनी गवळी यांना भर्ती करुन घेतले.
काल त्यांनी बाथरुमच्या खिडकीतून उडी टाकली. गंभीर जखमी अवस्थेत त्यांना जवळच्या जे जे रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला.
शिपाई गवळी यांनी हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण स्पष्ट नाही. त्यांच्या कुटुंबाकडूनही माहिती घेतली जात आहे.