
नागपूर NAGPUR : मेळघाटातील आदिवासींच्या आरोग्यासाठी आपले आयुष्य वाहून घेणारे सामाजिक कार्यकर्ते डॉ. रवींद्र व डॉ. स्मिता कोल्हे Dr. Ravindra and Dr. Smita Kolhe या दाम्पत्याला पद्मगंधा प्रतिष्ठानचा नववर्षातला पहिला ‘नलिनी बाळकृष्ण देवपुजारी’ स्मृती जीवनगौरव पुरस्कार Memorial Lifetime Achievement Award जाहीर झालाय. मेळघाट या आदिवासी क्षेत्रातील बैरागड या दुर्गम गावातील आदिवासी लोकांना कोल्हे दाम्पत्य वैद्यकीय सेवा पुरवीत आहेत. त्यांच्या या सेवा कार्याची दखल घेत भारत सरकारच्यावतीने अलिकडेच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले आहे. आता पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने देखील त्यांचा गौरव होत आहे.
येत्या २० जानेवारी २०२४ ला शनिवारी श्रीशक्तिपीठ रामनगर येथे संध्याकाळी ५ वाजता आयोजित कार्यक्रमात हा पुरस्कार कोल्हे दाम्पत्याला प्रदान करण्यात येणार आहे. कार्यक्रमाला संस्कृत विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. पंकज चांदे, डॉ. गिरीश गांधी, डॉ.सतीश देवपुजारी, माधुरी साकुळकर उपस्थित राहणार आहेत. पद्मगंधा प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणाऱ्या जीवन गौरव पुरस्काराचे यंदाचे २४ वे वर्ष आहे. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मराठी व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान केला जातो.
यापूर्वी पद्मगंधा प्रतिष्ठानने डॉ. रघुनाथ माशेलकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, ॲड.उज्वल निकम, जेष्ठ अभिनेते दिलीप प्रभावळकर, क्रिकेटवीर सुनील गावस्कर, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, जेष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, पर्सिस्टंटचे सर्वेसर्वा डॉ आनंद देशपांडे अशा अनेक मान्यवरांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित केले आहे.