बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का?

0

* उद्धव ठाकरे शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का?

मुंबई,(Mumbai) १७ मार्च : राहुल गांधी (Rahul Gandhi)आणि त्यांचा पक्ष बाळासाहेबांच्या पुण्यतिथी किंवा जयंतीला त्यांना विनम्र अभिवादन करीत नाहीत. तुम्ही का करीत नाहीत? असा प्रश्न विचारण्याचे धाडस उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) दाखवणार का? वंदनीय बाळासाहेबांच्या स्मारकाला राहुल गांधी अभिवादन करतील का? हा सामान्य शिवसैनिकांच्या मनातील प्रश्न आहे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे.

बावनकुळे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, शिवतीर्थ हे महाराष्ट्रासाठी तीर्थक्षेत्र आहे. शिवतीर्थ म्हणजे वंदनीय बाळासाहेब ठाकरे असे समीकरण, यापूर्वी याच शिवतीर्थावरून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जबरदस्त वाणीतून राष्ट्रप्रेमाचा, हिंदुत्वाचा आणि देशभक्तीचा पहिला हुंकार उठला होता. याच शिवतीर्थावरून हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसाच्या सन्मानासाठी आणि हक्कासाठी शिवसेनेची स्थापन केली.

‘‘शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही, त्यापेक्षा माझं दुकान बंद करेन,‘‘ असे रोखठोक बजावणाऱ्या हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेबांचे स्मारकही शिवतीर्थावर आहे. ‘न्याय यात्रेची’ नाटक कंपनी घेऊन राहुल गांधी याच शिवतीर्थावर येणार आहेत. आता उद्धव ठाकरे याच शिवतीर्थावर जाऊन राहुल गांधींसमोर शरणागत होणार का? असा प्रश्नही बावनकुळे यांनी विचारला आहे.