दंतेवाडा (Dantewada): छत्तीसगडमधील दंतेवाडा येथे नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात ११ जवान शहीद झाल्याची प्राथमिक माहिती आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुपारी नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या आयईडी स्फोटामध्ये दहा डिआरजी (डीस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्ड्स) जवान आणि त्यांचा वाहन असे ११ जण शहीद झाले आहेत.(Naxal Attack in Dantewada) नक्षलवादविरोधी मोहिमेवरून हे पथक परत येत असताना ही घटना घडली. दंतेवाडा जिल्ह्यातील अरणपूर पोलीस स्टेशन हद्दीतील अरणपूर-समेलीदरम्यान हा हल्ला झाला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमकही झाली आहे.
या चकमकीदरम्यान माओवाद्यांनी वाहनावर बॉम्ब फेकले. या हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Union Home Minister Amit Shah)यांनी छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Chief Minister Bhupesh Baghel)यांच्याशी फोनवर चर्चा केल्याची माहिती मिळत आहे. नक्षलवादी आणि जवानांमध्ये अजूनही चकमक सुरूच असल्याची माहिती आहे.
नक्षलवाद्यांशी सामना करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या डीआरजी अर्थात डिस्ट्रीक्ट रिझर्व्ह गार्डमध्ये विशेष प्रशिक्षण देण्यात आलेल्या स्थानिकांचा समावेश होता.
बस्तरमधील नक्षलवादविरोधी कारवायांमध्ये डीआरजीची मोठी मदत प्रशासनाला झाली आहे. दरम्यान, शहीद जवानांच्या कुटुंबीयांच्या दुःखात आपण सहभागी आहोत. ही लढाई आता शेवटच्या टप्प्यात असून हल्ला करणाऱ्या नक्षलवाद्यांना सोडणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी दिलाय.