खारघर घटनेवर विरोधकांचे केवळ राजकारण-सुधीर मुनगंटीवार

0

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार वितरण कार्यक्रमाची आधीची नियोजित वेळ सायंकाळची होती. मात्र, श्रीसेवकांची व्यवस्था पाहता कार्यक्रम रात्री ठेवू नका, अशी विनंती आप्पासाहेबांकडून करण्यात आली होती. उष्माघात हा नैसर्गिक होता. मात्र, सर्वपक्षीयांनी केवळ या मुद्यावर राजकारणच केले, अशी टीका राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी (Cultural Affairs Minister Sudhir Mungantiwar) केली आहे. एबीपी माझा या वाहिनीशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी केलेले काम मोठे आहे. श्रीसेवक हे त्यांच्यासाठी व त्यांच्यावर असलेल्या प्रेमापोटी आले होते. ते काही गाड्या पाठवून आलेले लोक नव्हते. श्रीसेवकांना घरी जाण्यासाठी सोय म्हणून हा कार्यक्रम दुपारी घेतला गेला, असे मुनगंटीवार म्हणाले.
मुनगंटीवार म्हणाले की, या घटनेत १४ पेक्षा अधिक मृत्यू झाल्याचा व सरकार आकडे लपवत असल्याचा आरोप सातत्याने विरोधक करीत आहेत. मुद्दाम खोटा प्रचार करून आकड्यांबाबत अफवा पसरविल्या जात आहेत. मृत्यूचा निश्चित आकडा माहिती असणाऱ्याने पुढे यावे, असे आव्हानही मुनगंटीवार यांनी यावेळी दिले. कार्यक्रमाचे नियोजन व्यवस्थित होते. अतिशय सूक्ष्म नियोजन करण्यात आले होते. मात्र, उष्णता इतकी वाढेल, याची कोणीही कल्पना केली नव्हती, असे नमूद करून मुनगंटीवार म्हणाले, जवळचे पाणी संपलेले असताना देखील लोक उठून गेले नाहीत. पाण्याची व्यवस्था असताना देखील ते पाणी प्यायला गेले नाहीत. 20-25 लाख लोकांना बसता येईल, असा मंडप घालणे अशक्य आहे. अशी दुर्दैवी घटना घडेल असा कोणी विचार देखील नव्हता केली, असेही ते म्हणाले.