
टाटा स्ट्राईव्हच्या पारडी येथील कौशल्य विकास केंद्रात उद्घाटन
वर्ष २०२६ हे महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीचे द्विशताब्दी वर्ष, संत गाडगे महाराज यांच्या जयंतीचे १५० वे वर्ष व महाड चवदार तळे सत्याग्रहाचे शताब्दी वर्ष आहे. या ऐतिहासिक वर्षांचे औचित्य साधून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त ‘बार्टी’तर्फे (डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था) “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताह” आयोजित करण्यात आला आहे. नागपूर येथील बार्टी प्रादेशिक कार्यालयातर्फे टाटा स्ट्राईव्हच्या पारडी येथील कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रात बुधवारी (८ एप्रिल) या सप्ताहाचे उद्घाटन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितित संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन झाले. उद्घाटन सत्राचे प्रास्ताविक सलमान शेख यांनी केले. त्यांनी सामाजिक समता सप्ताहामागची बार्टीची भूमिका विशद केली. टाटा स्ट्राईव्हचे आकाश ढेंगे यांनी बार्टीच्या वतीने अनुसुचित जातीसाठी राबविण्यात येत असलेल्या कौशल्य विकास प्रशिक्षणाची माहिती दिली. याप्रसंगी तुषार सूर्यवंशी यांनी थोर महामानवांच्या कर्तृत्वाचा आढावा घेतला.
टाटा स्ट्राईव्हचे विद्यार्थी अक्षय मानवटकर व शुभम इंगळे यांनी संविधानिक मुल्यांवर आपले विचार मांडले. बार्टीचे प्रकल्प व्यवस्थापक अनिल वाळके यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात वाळके यांनी बार्टीच्या विविध योजनांची माहिती देऊन ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
सामाजिक समता सप्ताहाच्या अंतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय मुलांचे वसतिगृह, राष्ट्रपिता ज्योतिबा फुले अभ्यासिका आणि संघमित्रा शाळा (हावरापेठ) येथे बार्टीच्या योजनांच्या प्रचारासह महामानवांच्या कार्यावर आधारित व्याख्याने, वक्तृत्व व निबंध स्पर्धा आणि प्रबोधनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच रहाटेनगर टोली आणि सिद्धेश्वरी वस्ती येथे स्वच्छता अभियान व जनजागृती रॅली काढण्यात येणार आहे.
सामाजिक समता सप्ताहा अंतर्गत बार्टी प्रादेशिक कार्यालयात ‘संविधान कक्षा’चे उद्घाटन करण्यात येणार आहे. या निमित्ताने महिला मेळावा आणि संविधानिक मूल्यांचा जागर करणारे कविसंमेलन आयोजित केले जाणार असल्याची माहिती बार्टी प्रादेशिक कार्यालयातर्फे देण्यात आली आहे.
उद्घाटन सत्राचे सूत्रसंचालन सरिता महाजन यांनी तर आभार सुनीता झाडे यांनी मानले. या प्रसंगी टाटा स्ट्राईव्हचे प्रोजेक्ट मॅनेजर योगेश खिराडे, अविनाश पाटील, रीना मारोतकर, काजल भरतवाडे, नीरज नानोरी यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.
सा. प्रकल्प व्यवस्थापक
बार्टी प्रादेशिक कार्यालय, नागपुर
















