चीनची कुरघोडी अन् भारतानं अख्खा संघच परत बोलावला!

0

नवी दिल्ली-सीमावादातून चीनकडून सातत्याने भारताविरुद्ध कारवाया सुरुच असताना ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स’ च्या निमित्ताने चीनने पुन्हा एकदा कुरघोडी केली. त्याला उत्तर म्हणून भारताने या स्पर्धांसाठी पाठविलेला अख्खा संघच विमानतळावरून माघारी बोलावला. चीनमध्ये ‘वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स’ या नावाने मार्शल आर्टच्या स्पर्धा भरवल्या जातात. यासाठी भारतातूनही संघ पाठवला जातो. याहीवर्षी भारताकडून असा संघ पाठवण्यात येत होता. या संघात अरुणाचल प्रदेशमधील तीन खेळाडूंचा समावेश होता. मात्र, चीनने व्हिसा देताना इतर खेळाडूंना ‘स्टॅम्प व्हिसा’ दिला असून फक्त अरुणाचलमधल्या तीन खेळाडूंना ‘स्टेपल्ड व्हिसा’ जारी केला. अरुणाचल प्रदेशवर दावा करणाऱ्या चीनने जाणीवपूर्वक ही कुरखोडी केल्याने भारताने देखील पलटवार केला.
चीनने केलेल्या एका कृतीचा निषेध करण्यासाठी भारताने आपला आख्खा संघच या स्पर्धेतून मागे घेतला आहे. भारतीय संघाला विमानतळावरूनच माघारी फिरविण्यात आले. गुरुवारी मध्यरात्री नवी दिल्ली विमानतळावर भारतीय संघाच्या प्रस्थानाला काही मिनिटे शिल्लक असताना हा दौरा रद्द करण्यात आला. परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी यासंदर्भात भारताची भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, चीनचा हा निर्णय अस्वीकारार्ह असून अशा प्रकारच्या कृतीला योग्य तऱ्हेनं उत्तर देण्याचे अधिकार भारताकडे आहेत. आम्ही यासंदर्भात आमची भूमिका चीनी प्रशासनाला कळवली आहे. दरम्यान, चीनने आरोप फेटाळले आहेत.