“पात्रता असुनही मुलीला बाजुला ठेवलं..” शरद पवार असं का म्हणाले?

0

बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अजित पवार गटाला उद्देशून महत्वाचे वक्तव्य केले आहे. “सुप्रिया सुळे पात्र असूनही मी त्यांना बाजूला ठेवून सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी दिली”, अशी भावना पवार यांनी शुक्रवारी बारामती येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधताना व्यक्त केली. आगामी लोकसभा निवडणुकीत आपल्याविरोधात प्रचार करणाऱ्यांचे हात थरथरतील, असा इशाराही त्यांनी दिलाय. (NCP President Sharad Pawar)

शरद पवार म्हणाले, “मला लोक सांगायचे ताई तिसऱ्यादा निवडून आल्या असून, त्यांना संधी द्या. पण पात्रता असताना देखील स्वतःच्या मुलीला बाजूला ठेवले आणि कार्यकर्त्यांना संधी दिली. सलग आठवेळा संसदरत्न मिळाला. काहीना काही योगदान असेल ना?, अशा भावना पवारांनी यावेळी व्यक्त केल्या. “ आजची लढाई विचाराची लढाई आहे. जे लोक आज गेले आहे, ते राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडून आले आणि ते आज भाजपसोबत गेले. सत्ता येते आणि जाते. लोकशाहीमध्ये विरोधी आणि सत्ताधारी असे दोन पक्ष असले पाहिजेत. लोकशाहीत एकच पक्ष असला तर तो हिटलरचा हुकूमशाहीचा पक्ष असतो. आपल्याला हुकूमशाहीचा पक्ष नको, आपल्याला लोकांचा पक्ष पाहिजे. सत्तेतला पक्ष काम करतो, विरोधी पक्ष लोकांमध्ये जाऊन काम करतो,” असे पवार म्हणाले. काही लोक अजित पवारांच्या गटात मनाने नाहीत पण भीतीने गेले आहेत तर काही जण सत्तेसाठी गेले आहे, असा दावाही त्यांनी केलाय.