फ्लिपकार्ट फाऊंडेशनचा किनीर सर्व्हिसेसशी सहयोग

0

* तृतीयपंथी समुदाय आणि अन्य एलजीबीटीक्यू प्लस व्यक्तींना रोजगाराच्या संधी देऊन समावेशनाची जोपासना

* ३०० एलजीबीटीक्यू प्लस व्यक्तींना कौशल्यांचे प्रशिक्षण देण्याच्या लक्ष्य

मुंबई (Mumbai), १९ मार्च : फ्लिपकार्ट फाउंडेशन ह्या फ्लिपकार्ट समूहातील सेवाभावी शाखेने, ‘ट्रान्स-फॉर्मेशन’ प्रकल्पासाठी, किनीर सर्व्हिसेस ह्या लिंग संवेदनशीलतेचा पुरस्कार करणाऱ्या संस्थेशी सहयोग केला आहे. सीमांत तृतीयपंथी समुदाय आणि एलजीबीटीक्यूप्लस श्रेणीत येणाऱ्या अन्य व्यक्तींची उन्नती साधण्याच्या उद्दिष्टाने ‘ट्रान्स-फॉर्मेशन’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. ह्या सहयोगाच्या माध्यमातून, एलजीबीटीक्यूप्लस व्यक्तींसह ३०० तृतीयपंथीयांना सर्वसमावेशक प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रतिष्ठित रोजगार संधींमार्फत ह्या व्यक्तींना नोकरी मिळवण्यात मदत करण्याचे उद्दिष्ट ह्या प्रकल्पापुढे आहे.

एलजीबीटीक्यूप्लस व्यक्तींसह तृतीयपंथीयांसाठी उपजीविका निर्मितीची जोपासना करणे आणि समाजात त्यांना अधिक सामावून घेणे ह्यांच्याप्रती समर्पण, दिल्ली आणि मुंबईत कार्यान्वित असलेल्या ह्या सहयोगात्मक प्रकल्पातून, अधोरेखित होते. ह्या सर्वांना विविध टप्प्यांमध्ये विशेष सहाय्य केले जाणार आहे. ह्यात प्रशिक्षण सुविधा प्रस्थापित करणे, एकत्रीकरण, प्रत्यक्ष सर्वांगीण प्रशिक्षण, प्रमाणपत्रे, रोजगार निर्मिती व नोकऱ्या मिळवण्यात मदत करणे ह्या सर्वांचा समावेश होतो.

शिवाय, एलजीबीटीक्यूप्लस समुदायातील व्यक्तींच्या नियुक्तीबाबत खुला दृष्टिकोन असलेल्या कंपन्यांशी सहयोग करून, ह्या समुदायासाठी सहाय्यकारी व समावेशक वातावरण निर्माण करण्याच्या, दीर्घकालीन यशाच्या तसेच समाजाची स्वीकृती मिळवण्याच्या दृष्टीने, हा उपक्रम प्रयत्नशील आहे.

फ्लिपकार्ट फाउंडेशनच्या संचालक पूजा त्रिसाल ह्या कार्यक्रमाबद्दल म्हणाल्या, “सीमांत समुदायांना जोमाने वाढण्याचे मार्ग निर्माण करून देण्याचे महत्त्व फ्लिपकार्ट फाउंडेशनला समजते. किनीर सर्व्हिसेसशी झालेल्या सहयोगाच्या माध्यमातून आम्ही केवळ कौशल्य प्रशिक्षण व रोजगार निर्मिती करत नाही आहोत, तर आम्ही सामाजिक अडथळे सक्रियपणे मोडून काढत आहोत आणि एकंदर तृतीयपंथी समुदायाला आणि अन्य एलजीबीटीक्यूप्लस व्यक्तींना आदरपूर्वक मान्यता मिळावी ह्याचा पुरस्कार करत आहोत. प्रत्येक व्यक्तीला मनुष्यबळात आणि एकंदर समाजात अर्थपूर्णरित्या योगदान देण्याची संधी मिळालीच पाहिजे ह्या तत्त्वावरील आमचा विश्वास ह्या उपक्रमातून प्रत्यक्षात येत आहे.”

किनीर सर्व्हिसेसचे कार्यकारी संचालक डॉ. मनीष जैन म्हणाले, “सहसा विसरल्या जाणाऱ्या आणि दुर्लक्षित राहणाऱ्या ह्या समुदायाच्या समावेशनावर, तो मुख्य प्रवाहात आणण्यावर, किनीरने लक्ष केंद्रित केले आहे. शिक्षणाच्या व कौशल्यांच्या अभावामुळे ह्या समुदायातील व्यक्तींसाठी रोजगाराच्या संधींमधील तफावत अधिक रुंदावते. ह्या समुदायाला आवश्यक कौशल्यसंचल आत्मसात करता यावेत ह्याची निश्चिती करून फ्लिपकार्ट फाउंडेशन थांबत नाही, तर त्यांना अत्याधुनिक अध्ययन सुविधाही उपलब्ध करून देते ह्याबद्दल आम्ही खूपच कृतज्ञ आहोत. आम्ही एकत्रितपणे अधिक समावेशक जग निर्माण करू.”

ट्रान्स-फॉर्मेशन हा तृतीयपंथी आणि एलजीबीटीक्यूप्लस समुदायासाठी आशेचा व प्रगतीचा दीपस्तंभ आहे. व्यक्तींना नियमित कार्यात्मक प्रक्रिया तसेच रसायने, साधने, स्वच्छतेची यंत्रे आणि आर्थिक नियोजन ह्यांसारख्या सर्वांगीण हाउसकीपिंग सेवेसाठी आवश्यक कौशल्यांनी सुसज्ज केले जाते, जेणेकरून, प्रशिक्षणार्थी ह्या कामाशी उत्तमरित्या परिचय करून घेऊ शकतील. हाउसकीपिंगच्या तांत्रिक अंगांच्या प्रशिक्षणासह प्रशिक्षणार्थींना ग्राहकांशी वर्तणूक, कामाच्या ठिकाणचे शिष्टाचार आणि ग्रूमिंग ह्यांसारख्या सॉफ्ट स्किल्सचे प्रशिक्षणही दिले जाते. प्रशिक्षणार्थींमधील निर्णयक्षमता व परिस्थिती हाताळण्याची कौशल्ये अधिक चांगली व्हावीत म्हणून परिस्थितीनुरूप ‘रोल प्ले’ घेतले जातात. हा सहयोग केवळ संधी निर्माण करण्यासाठी नव्हे, तर आयुष्ये बदलून टाकण्यासाठी आहे. रोजगार प्राप्त झाल्यानंतरही मदत करणे तसेच समावेशकतेची जोपासना ह्यांच्या अविचल वचनासह अधिक न्याय्य व स्वीकारशील समाज घडवण्याच्या दिशेने हा उपक्रम काम करत आहे.

ह्यापूर्वीही फ्लिपकार्ट फाउंडेशनने आंध्रप्रदेश, आसाम, हरयाणा, गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण, उत्तराखंड, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल आदी राज्यांतील दुर्लक्षित समुदायांसाठी काम केले आहे. समाजातील अकुशल व वंचित घटकांना अनेक क्षेत्रांत सेवा, सहाय्य व सक्षमीकरणाच्या संधी पुरवून कमाल व्याप्ती व शाश्वत प्रभावाची निश्चिती फ्लिपकार्ट फाउंडेशनने केली आहे.