पुणे : पुण्यात जम्बो कोव्हीड सेंटरची उभारणी करण्यासाठी निविदा मिळविण्यासाठी भागदारीचे बनावट डीड तयार केल्याप्रकरणी खासदार संजय राऊत यांचे भागिगादर सुजित पाटकर यांच्यासह चौघा जणांवर गुन्हे दाखल करण्यात (Jumbo Covid Center Scam) आले आहेत. निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरता हा घाेटाळा केल्यावरून शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शुक्रवारी दिली. डॉ. हेमंत रामशरण गुप्ता, सुजित मुकुंद पाटकर ,संजय मदनराज शहा, राजू नंदकुमार साळुंखे अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघांनी लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस या जम्बो कोविड सेंटरच्या वैद्यकीय सेवा परिचलनासाठी निविदा प्रक्रियेत निवड होण्याकरीता बनावट पार्टनरशिप डीड तयार केल्याचे उघड झाले आहे.
यासंदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीनुसार, संजय राऊत मित्र परिवाराने 100 कोटींचा जम्बो कोविड सेंटर घोटाळा केल्याचा दावा किरीट सोमय्या यांनी केला होता. संजय राऊत यांचे निकटवर्तीय आणि भागिदार सुजीत पाटकर यांनी बनावट कंपनी निर्माण करून, मुंबईतील कोविड सेंटर्सचं कंत्राट मिळवले, असे हे प्रकरण आहे. या ठिकाणी अनेक करोनाबाधित रूग्णांचे मृत्यू झाले. या घोटाळ्यात 80 कोटी रुपये महापालिकेने पेमेंट केले व 20 कोटींचे दुसरे पेमेंट होणार असल्याचा दावा सोमय्यांनी केला होता. ही निविदा मंजूर करून घेऊन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण यांची फसवणूक केली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपींवर भादवी कलम 420, 426, 465, 467 ,468, 471, 511 ,34 नुसार गुन्हा दाखल झालेला आहे.
राऊतांचे कानावर हात
दरम्यान, पुण्यात गुन्हे दाखल झाल्यावर संजय राऊत यांना पत्रकार परिषदेत याबाबत विचारणा झाली असता त्यांनी मला माहिती नसल्याचे उत्तर दिले.