भ्रष्टाचार मुक्तीची सुरुवात नागपुरातून व्हावी- राज्यपाल बनवारीलाल पुरोहित

0

 

-वनामतीत सार्थक फाउंडेशनतर्फे सन्मान सोहळा

नागपूर : मनुष्य साधी राहणी व आदर्श जीवनशैली ठेवत जीवन जगला, पापाचा पैसा घरात येऊ दिला नाही तर देशातील भ्रष्टाचार संपवू शकतो आणि भारत जगात विश्वगुरू होऊ शकतो. भ्रष्टाचारमुक्त देशाची सुरुवात ही नव्या पिढीने नागपूर शहरातून करावी, यासाठी समाजातील प्रतिभावंतांचा सन्मान करणाऱ्या सार्थक फाउंडेशन सारख्या संस्थांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी केले.

32 संस्था एकत्रित येत स्थापन झालेल्या सार्थक फाउंडेशनतर्फे शुक्रवारी सायंकाळी वनामतीत आयोजित सन्मान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांच्या हस्ते वनराईचे विश्वस्त डॉ. गिरीश गांधी, जनआक्रोशचे संस्थापक रवींद्र कासखेडीकर, आंतरराष्ट्रीय सायकलपटू डॉ. अमित समर्थ, अनेक विश्वविक्रम नावावर असणारे आणि पहिल्या दहा उत्कृष्ट शेफमध्ये आलेले प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांना शाल,श्रीफळ,सन्मानपत्राने गौरविण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री आ. सुनील केदार तर विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री रमेशचंद्र बंग व्यासपीठावर उपस्थित होते. फाउंडेशनचे अध्यक्ष महेश बंग, सचिव विनोद चतुर्वेदी, कोषाध्यक्ष संजय पालिवाल, विश्वस्त राजाभाऊ टांकसाळे आदी मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. नागपूर ‘मिनी इंडिया’ नव्या पिढीकडून अपेक्षा यावेळी राज्यपाल पुरोहित म्हणाले,नागपूर हे ‘ मिनी इंडिया’ असून सर्व प्रांताची संस्कृती येथे जपली जाते याचा आम्हाला अभिमान आहे. कधीकाळी पूर्णपणे उध्वस्त झालेला जपान आज आपल्यापुढे गेला असून 1947 साली स्वतंत्र झालेल्या भारतात सर्व प्रश्न सुटलेत का, आम्हाला हवे ते मिळाले का, असा सवाल उपस्थित करीत त्यांनी सामान्यांना आशा असलेल्या न्यायदान प्रक्रियेत कधीकधी ओले-सुके सारेच जळते या वास्तवाकडे काही उदाहरणांसह लक्ष वेधले. आपण राजभवनात शाकाहाराचा अवलंब केल्याने 50 टक्के खर्च वाचला. चुकीची बिले थांबली. खरेतर दुसऱ्याकडे पाहून व्यथित होऊ नका, मनुष्याला जेवढे मिळाले त्यात समाधान मानले पाहिजे. भ्रष्टाचार करुन जमविलेला पैसा हा कधीच टिकत नाही. नागपूरमध्ये सकारात्मक काम करणारी बरीच मंडळी आहे. नागपूरचा इतिहास लिहिण्यासारखा आहे. बाहेरुन येणाऱ्या लोकांचे आदरतिथ्य करणे आणि त्यांच्याशी संबंध जुळवून ठेवणे ही नागपूरची संस्कृती असल्याचे पुरोहित म्हणाले.

यावेळी आ सुनील केदार म्हणाले, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षात सारे प्रश्न सुटले का हे पडताळताना प्रत्येकाला आपल्या जीवनात स्वतःच्या पलीकडे जाऊन समाजासाठी जगले पाहिजे. शासनाने कायदे केले मात्र त्यातून सामाजिक प्रश्न सुटले का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. यावेळी डॉ गिरीश गांधी म्हणाले, शहराची ओळख विकासकामापेक्षा प्रतिभावान माणसांमुळे होते. माणसे येतात आणि जातात. किती खासदार व नेते झाले हे लोकांना आठवणार नाही. मात्र, साहित्यिक, सामाजिक काम करणाऱ्या व्यक्ती लोकांच्या नेहमी आठवणीत राहतात. यावेळी रमेश बंग, विष्णू मनोहर, रवींद्र कासखेडीकर व अमित समर्थ यांची सत्काराला उत्तर देणारी भाषणे झाली. हा आपला नव्हे तर शहराचा, सहकाऱ्यांचा सन्मान असल्याची भावना व्यक्त केली.
कार्यक्रमाला जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष मुक्ता कोक्कडे, माजी आमदार गिरीश व्यास, माहिती आयुक्त राहुल पांडे, बुटीबोरी इंडस्ट्रियल असोसिएशनचे प्रदीप खंडेलवाल जिल्हा परिषदेतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते दिनेश बंग, शब्बीर अहमद विद्रोही, जाऊदयाल मल, बाळ कुलकर्णी, अजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत सार्थक फाउंडेशनचे अध्यक्ष महेश बंग यांनी केले. प्रास्ताविक सचिव विनोद चतुर्वेदी यांनी तर सूत्रसंचालन सुधीर बाहेती यांनी केले.आभार पंकज महाजन यांनी मानले.