महाराष्ट्र बंदला प्रतिसाद न देणाऱ्या चालकांना घातल्या चपलांच्या माळा

0

आंदोलकांनी चौका-चौकात वाहने रोखुन नोंदवला निषेध

अमरावती AMRAWATI  दि. १० : हिट अँड रन कायद्या विरोधात दिलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला प्रतिसाद न देणाऱ्या वाहन चालकांचा आंदोलकांनी चपलांच्या माळा घालून सत्कार केला. चौका-चौकात वाहने रोखुन सर्व वाहन चालकांना या आंदोलनात सहभागी होण्याची सादही घालण्यात आली. दरम्यान मनपा स्वच्छता विभाग अंतर्गत कर्त्यव्यावर असलेल्या कचरा वाहक वाहनांवरील वाहन चालकांना भर चौकात उभे करून त्यांच्या गळ्यात आंदोलकांनी चपलांच्या माळा घातल्या, त्या घटनेचे (चालकाच्या गळ्यात चपलांचा हार घालत असतांना) व्हिडीओही बनवले.

जिल्हा वाहन चालक कृती समितीच्या बॅनरखाली बुधवारी (ता. १०) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. बुधवारी सकाळी इर्विन चौकातील आंदोलन मंडपातून वाहनचालकांची पदयात्रा निघाली. यावेळी रस्त्यावरून धावणाऱ्या वाहनांना रोखून त्यांना या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केल्या गेले. दरम्यान अनेक वाहनचालकांशी आंदोलकांची बाचा-बाचीही झाली. महानगर पालिकेच्या कचरा वाहक वाहनांही आंदोलकांनी रोखून धरले. आंदोलनात सहभागी होत नाही म्हणून त्यांचा चपलांच्या माळा घालून सत्कार केला. असे अमानवीय व भर चौकात अपमानीत करण्याचे कृत्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी या कृत्याचे बळी ठरलेल्या वाहनचालकांकडून होत आहे. पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दखल घेत दोषींवर कारवाई करणार असल्याचे म्हटले आहे.

बॉक्स
विदयार्थ्यांची शाळा बुडली
वाहन चालक कृती समितीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंद आंदोलनाचा फटका शहरातील शेकडो विद्यार्थ्यांना बसला. मुलांना शाळेत नेणाऱ्या बसेस न आल्याने अनेक पालकांना मुलांना शाळेत पोचवावे लागले. स्कुल बस चालकांनी ऐनवेळी येणार नसल्याचा संदेश दिल्याने अनेकांची चांगलीच गोची झाली. तर पालकांची तारांबळ उडून वेळेवर शाळेत पोहचू न शकलेल्या कित्येक विदयार्थ्यांची बुधवारची शाळा बुडाली.

बॉक्स
आंदोलन बेकायदेशीर – पोलीस आयुक्त
हिट अँड रन हा कायदा लागूच झालेला नाही. केंद्र सरकार व केंद्रीय वाहतूक तथा चालक संघटनाशीही तशी विस्तृत चर्चा झाली असून सर्व केंद्रीय संघटनांनी त्यांचे आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे. जो कायदा लागूच नाही त्या विरोधात होत असलेले हे आंदोलन, वाहने रोखणे, वाहन चालकांच्या गळ्यात चपलांच्या माळा घालणे, विना अनुमती मोर्चे काढणे बेकायदेशीर असल्याचे पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी सांगितले. आंदोलकांनी रीतसर परवानगी घेऊन, कायदा हातात न घेता संवैधानिक मार्गानेच आंदोलन करावे असे आवाहन करीत वाहनचालकांना चपलांच्या माळा घालणाऱ्यांवर कारवाई करणार असल्याची माहितीही यावेळी पोलीस आयुक्तांनी दिली.

बॉक्स
‘त्या’ आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्याचे निर्देश – उपायुक्त
बुधवारी शहरातील पंचवटी चौक, इर्विन चौक व अन्य मार्गावर मनपाच्या कचरा वाहक गाड्या व अन्य वाहने अडवून वाहनचालकांच्या गळ्यात चपलेचा हार घालणाऱ्या आंदोलकांवर गुन्हा दाखल करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संबंधित पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवून पुढील कारवाई करू अशी माहिती पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी दिली.