शिंदे गट हीच खरी शिवसेना, सर्व आमदार पात्र!

0

शिंदे गटाला दिलासा, ठाकरेंना मोठा धक्का!

मुंबई : EKNATH SHINDE एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील गट हीच खरी शिवसेना असल्याचा निर्वाळा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर Rahul Narvekar  यांनी आज आपल्या निकालात दिला. एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व १६ आमदार हे पात्र ठरले असून यासंदर्भात उबाठाच्या वतीने दाखल करण्यात आलेली याचिका वस्तुस्थिती लक्षात घेऊन फेटाळण्यात येत असल्याचे नार्वेकर यांनी आपल्या निकालात जाहीर केले. या निकालामुळे उद्धव ठाकरे यांच्या गटाला मोठा धक्का बसला आहे. दरम्यान, निकालानंतर शिंदे गटाकडून सर्वत्र जल्लोष साजरा केला जात आहे. (Shivsena MLA Disqualification Result)

शिवसेनेत जून २०२२ मध्ये झालेल्या फुटीनंतर चाललेल्या सत्तासंघर्षात खरी शिवसेना कोणाची, शिंदे गटातील १६ आमदार अपात्र ठरणार काय, या बहुचर्चित प्रश्नांची उत्तरे आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या निकालातून मिळाली आहेत. आपल्या निकालात विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी काही महत्वाच्या मुद्यांकडे लक्ष वेधले आहे. एकनाथ शिंदे यांचीच शिवसेना हा खरा शिवसेना पक्ष असल्याचे नार्वेकर यांनी निकालात स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे शिंदे गटाने नेमलेले प्रतोद भरत गोगावले यांची निवड वैध ठरत असल्याने त्यांचाच व्हीप अधिकृत मानता येईल व सुनील प्रभू यांना प्रतोद म्हणून मान्यता देता येणार नाही, असेही निकालात त्यांनी स्पष्ट केले.

शिवसेनेत पक्षप्रमुखाचाच निर्णय अंतिम, हा ठाकरे गटाचा दावा फेटाळण्यात आला आहे. नार्वेकर यांनी आपल्या निकालात नमूद केलेय की “शिवसेनेच्या घटनेनुसार पक्षप्रमुख थेट कुणालाही पक्षातून काढू शकत नाही. त्यामुळे तत्कालीन गटनेते एकनाथ शिंदेंना काढण्याचा उद्धव ठाकरे यांना कोणताही अधिकार नव्हता. घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकरणीसोबत चर्चा करुनच पक्षातून हकालपट्टीचा निर्णय घेणे अपेक्षित होते. शिवसेना पक्ष प्रमुखांना कोणालाही पक्षातून काढण्याचे अधिकार नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांना विधीमंडळ गटनेतेपदावरून हटवण्याचा अधिकारही नव्हता नाही.” पक्षप्रमुखाला सर्वोच्च अधिकार देणे, हे लोकशाहीला घातक आहे. असे झाले तर पक्षाला कुणीच पक्षप्रमुखाविरोधात बोलू शकणार नाही. शिवसेनेच्या घटनेत राष्ट्रीय कार्यकारिणीचा निर्णय अंतिम आहे, असे विधानसभा अध्यक्षांनी स्पष्ट केले. यासंदर्भात अध्यक्ष नार्वेकर यांनी निवडणूक आयोगाने यासंदर्भात दिलेल्या निकालाचेही दाखले दिलेत.

आमदार पात्रच

शिंदे गटाचे आमदार अपात्र ठरत नाहीत. बैठकीला गैरहजर राहणे, हे पक्षातून हकालपट्टीचे कारण होऊ शकत नाही, असे निरीक्षणही विधानसभा अध्यक्षांनी नोंदविले आहे.

ठाकरे गटाचे युक्तिवाद अमान्य नार्वेकर यांनी आपल्या निकालात नमूद केलेय की, निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरे गटाने सादर केलेल्या दाव्यातही तफावत आहे. एकीकडे ते सांगतात पक्षाची बैठक सेनाभवनात झाली, तर दुसरीकडे तीच बैठक ऑनलाईन झाल्याचे ते नमूद करतात. त्यामुळे त्यांची कागदपत्र संभ्रम निर्माण करणारी आहेत. २५ जून २०२२ ला पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक झाल्याचा दावा तसेच या बैठकीत ७ निर्णय घेतल्याचा दावा प्रभू आपल्या प्रतिज्ञापत्रात केला असला तरी या बैठकीचे कोणतेही मिनिट्स प्रतिज्ञापत्रात जोडलेले नाहीत. शिवसेनेच्या लेटरहेडवर ते निर्णय घेतल्याचे दाखविण्यात आले. त्यावर कुणाच्याही सह्या नाहीत, याकडे लक्ष वेधण्यात आले.

शिवसेना पक्षप्रमुख हे पद २०१८ साली निर्माण करण्यात आल्याचा उबाठाचा दावा आहे. पण अगोदर शिवसेना प्रमुख हे प्रमुख पद होते. राष्ट्रीय कार्यकारिणी मध्ये १९ पैकी १४ सदस्य हे प्रतिनिधी सभेतून निवडून येणार होते तर ५ शिवसेना प्रमुख नियुक्त होते. २०१८ सालच्या पक्षीय रचनेत केलेले बदल हे शिवसेनेच्या घटनेनुसार नाहीत. त्यामुळे २०१८ सालची पक्षाच्या घटनेतील दुरुस्ती ही मान्य करता येणार नाही. पक्षात बंडाळी झाल्यानंतर पक्षप्रमुख या नात्याने नेता आपला आदेश पक्षाचा आदेश म्हणून वापरू शकतो. पण जर पक्षातील इतर नेत्यांनी घटनेच्या आधारावर नवा नेता पक्षप्रमुख म्हणून निवडला असेल तर त्याचाच दावा घटनेनुसार अधिकृत मानावा लागेल, असेही निरीक्षण नार्वेकर यांनी नोंदविले आहे.
दरम्यान, निकालापूर्वी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर यांनी चेंबरमध्ये विधिमंडळ सचिव यांच्याशी सुमारे अर्धा तास चर्चा पार केली. त्यानंतर नार्वेकर सेन्ट्रल हॉलमध्ये दाखल झाले आणि काही वेळातच त्यांनी निकाल वाचनाला सुरुवात केली. तत्पूर्वी, त्यांनी मार्गदर्शनासाठी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानले.