
Three persons were washed away in flood waters
23MREG64 अमरावती जिल्ह्यात तीन जण गेले पुराच्या पाण्यात वाहून
अमरावती, 23 जुलै (हिं.स.) : जिल्ह्यात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे अनेक भागात पुरसदृश स्थिती निर्माण झाली असून चांदुर बाजार, वरूड, मोर्शी, धामणगाव रेल्वे तालुक्यांना पावसाचा सर्वाधिक फटका बसला आहे. धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका पटाचे या गावातील एका शेतकऱ्याचा पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. मोर्शी तालुक्यात माळू नदीच्या पुरात वाहून गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला, तर चांदूर बाजार तालुक्यातील शिरजगव बंड येथील एक युवक नाल्याच्या पुरात वाहून गेला.
धामणगाव रेल्वे तालुक्यातील जळका पटाचे या गावातील नाल्याला पूर आला होता. आज दुपारी एका शेतकऱ्याचा पुरात वाहून गेल्याने मृत्यू झाला. उमेश मारोती मोडक (३४) असे मृताचे नाव आहे. ते शेतातून आपल्या गावी परतत असताना नाल्याच्या पुरात वाहून गेले. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेल्या सालबर्डी येथील मंदिरात पूजेसाठी आलेली मध्य प्रदेशातील एक महिला माळू नदीत पडली. तिचा मृतदेह मोर्शी तालुक्यात आढळून आला असून तिची ओळख पटविण्याचे काम सुरू आहे.
आज दुपारी चार वाजताच्या सुमारास पूर्वेश नामदेव पारीसे (२०) हा युवक शिरजगाव बंड येथील नाल्यात वाहून गेला. शोधमोहीम सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. जिल्ह्यात गेल्या चोवीस तासापासून संततधार पाऊस सुरू आहे. पूर्णा धरणाचे दरवाजे उघडण्यात आल्याने अनेक गावांमध्ये पूर आला आहे. आज सकाळी चिंचोली, गौरखेडा, मार्कांडा या गावांचा संपर्क तुटला होता. जिल्ह्यातील सर्व नदी, नाले, दुथडी भरून वाहत आहेत. अप्पर वर्धा धरणातून विसर्ग सुरू असल्याने नदी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्या तील पूर्णा आणि गर्गा प्रकल्पातून देखील विसर्ग सुरू आहे.