केजरीवालांच्या ईडी काेठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ

0

नवी दिल्ली (New Delhi), २८ मार्च : दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणी अटकेत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ()यांच्या ईडी काेठडीत १ एप्रिलपर्यंत वाढ केली आहे. आज (२८ मार्च) त्यांची कोठडी संपली. त्यामुळे त्यांना दुपारी २ वाजता दिल्लीतील राऊस एव्हेन्यू न्यायालयात हजर करण्यात आले.

यावेळी अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एसव्ही राजू आणि ईडीचे विशेष वकील जोहेब हुसेन हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून, तर केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील रमेश गुप्ता यांनी युक्तीवाद केला.

तपासाला जाणीवपूर्वक सहकार्य केलेले नाही – ईडी

एसव्ही राजू यांनी सांगितले की, दिल्ली मद्य धोरण संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणी केजरीवाल यांचे म्हणणे नोंदवले गेले. पण त्यांनी टाळाटाळ करणारी उत्तरे दिली. त्यांनी या प्रकरणी सुरु असणार्या तपासाला जाणीवपूर्वक सहकार्य केलेले नाही. या प्रकरणी ईडीला डिजिटल डेटा तपासायचा आहे. केजरीवाल यांच्यासाठी ईडीने आणखी सात दिवसांची कोठडी मागितली.

आम आदमी पार्टीला उद्ध्वस्त करणे हाच ईडी कारवाई मागील मूळ हेतू – केजरीवाल

यावेळी केजरीवाल यांचे वकील गुप्ता यांनी केजरीवाल यांना न्यायालयाला वैयक्तिकरित्या संबोधित करायचे असल्याचे सांगितले. न्यायालयाने केजरीवाल यांना आपलं म्हणणं मांडण्याची संधी दिली. केजरीवाल यांनी स्वत: युक्तीवाद केला. आम आदमी पार्टीला उद्ध्वस्त करणे हाच अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) कारवाई मागील मूळ हेतू आहे. मद्य धोरण प्रकरणी मला जाणीवपूर्वक अडकवणे हेच ‘ईडी’चे एकमेव ध्येय आहे. मी रिमांड याचिकेला विरोध करत नाही. ‘ईडी’ मला हवे तितके दिवस कोठडीत ठेवू शकते; पण तपासानंतरच हा घोटाळा सुरु झाला आहे, असा दावा त्यांनी केला.

केजरीवाल म्हणाले, हे प्रकरण दोन वर्षांपूर्वीपासून सुरू आहे. सीबीआयने ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर ECIR फाइल तयार झाली. मला कोणी अटक केली? कोणत्याही न्यायालयाने मला दोषी ठरवले नाही किंवा माझ्यावर आरोपही केलेले नाहीत. आम आदमी पार्टीला उद्ध्वस्त करणे हाच अंमलबजावणी संचालनालयाचा (ईडी) मूळ हेतू होता. मद्य धोरण प्रकरणी मला ‘सापळ्यात’ अडकवणे ईडीचे एकमेव ध्येय आहे, असा आरोपही त्यांनी केला. मला अटक करण्यात आली होती, कोणत्याही न्यायालयाने मला दोषी सिद्ध केले नाही. सीबीआयने ३१ हजार पानांची आणि ईडीने २५ हजार पानांची याचिका दाखल केली आहे. तुम्ही ते एकत्र वाचले तरी, मला अटक करण्याचे कारणच नव्हते. कारण जर १०० कोटी रुपयांचा दारू घोटाळा झाला असेल तर तो पैसा कुठे आहे? असा सवाल करत ईडीच्या तपासानंतर खरा घोटाळा सुरू झाला. या प्रकरणातील माफीचा साक्षीदार सरथ रेड्डी याने भाजपला ५५ कोटी रुपये दान केले आहे. हे मोठे रॅकेट असून, माझ्याकडे याचे पुरावे आहेत. मला अटक झाल्यानंतर भाजपला ही देणगी मिळाली, असा गंभीर आराेपही त्यांनी या वेळी केला.

दाेन्ही बाजूंचा युक्तीवादानंतर राऊस एव्हेन्यू न्यायालयाने केजरीवालांच्या ईडी काेठडीत चार दिवसांची वाढ केली. आता १ एप्रिल रोजी सकाळी ११.३० वाजता केजरीवाल यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.