दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी

0

नवी दिल्ली (New Delhi), 28 मार्च : लोकसभेची निवडणूक घोषित झाल्यापासून राजकीय पक्षांची पहिल्या टप्प्यातील निवडणुकीसाठी लगबग सुरू असतानाच निवडणूक आयोगाने आता निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याची अधिसूचना जारी करण्यात आलीय.

आयोगाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 12 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील 88 लोकसभा मतदारसंघात मतदान होणार आहे. त्यासाठी निवडणूक आयोगाने वेळापत्रक जारी केले आहे. यामध्ये आसामचे 5, बिहारचे 5, छत्तीसगडमधील 3, जम्मू-काश्मिरातील 1, कर्नाटकचे 14, केरळमधील 20, मध्यप्रदेश 7, महाराष्ट्रात 8, राजस्थानचे 13, त्रिपुरा 1, उत्तरप्रदेश 8, पश्चिम बंगालमधील 3 आणि मणिपूरच्या एका मतदारसंघाचा समावेश आहे.

दुसऱ्या टप्प्यातील जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. याठिकाणी आगामी 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्याचे मतदान होणार आहे. दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 एप्रिल अखेरची तारीख आहे. तर 8 एप्रिलपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील अकोला, अमरावती, बुलढाणा, हिंगोली, नांदेड, परभणी, वर्धा आणि यवतमाळ-वाशिम मतदारसंघात मतदान होणार आहे.