भाजपच्या प्रदेशाध्यक्षाकडून आदर्श आचारसंहितेचा भंग

0

 

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंकडून आदर्श आचारसंहितेचा भंग, तात्काळ कारवाई करावी: अतुल लोंढे.

खासदार नवनीत राणांच्या जात प्रमाणपत्र प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळेंकडून न्यायालयाचा अवमान आणि जनतेची दिशाभूल

नवनीत राणांचे प्रकरण अद्याप न्यायप्रविष्ठ असताना निकाल लागल्याचा बावनकुळेंचा दावा.

मुंबई (Mumbai), दि. २८ मार्च.
भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (State President of Bharatiya Janata Party Chandrasekhar Bawankule) यांनी आदर्श आचारसंहितेचा भंग केला असून निवडणुक आयोगाने त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचे प्रकरण सुप्रीम कोर्टात अद्याप प्रलंबित आहे, त्याचा निकाल लागलेला नाही असे असताना बावनकुळे यांनी निकाल लागला असल्याचा दावा करुन मा. न्यायालयाचा अवमान केला आहे, हा गंभीर गुन्हा असून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केली आहे.

यासंदर्भात काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिका-यांकडे लेखी तक्रार केली असून या तक्रारीत असे म्हटले आहे की, २८ मार्च २०२४ रोजी खासदार नवनीत राणा याच्या भारतीय जनता पक्षातील प्रवेशावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी, सुप्रीम कोर्टाने खासदार नवनीन राणा प्रकरणी निर्णय दिलेला आहे, अशा प्रकारचा चुकीचा व दिशाभूल करणारा खोटा दावा केला आहे. अशा पद्धतीचे विधान जाणीवपूर्वक करुन खोटी माहिती पसरवली जात आहे, हा प्रकार मतदारांवर प्रभाव टाकण्यारा आहे तसेच आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन असून भारतीय दंड संहिते अंतर्गत गुन्हा आहे, असेही अतुल लोंढे म्हणाले.

नवनीत राणा या अमरावती लोकसभा मतदारसंघातून २०१९ च्या निवडणुकीत विजयी झाल्या, अमरावतीची जागा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव आहे. या मतदारसंघातून विजयी झालेल्या नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र मा. मुंबई हायकोर्टाने २०२१ मध्ये रद्द ठरवत दोन लाखांचा दंडही ठोठावला आहे. त्यानंतर नवनीत राणा यांनी हायकोर्टाच्या निर्णयाला मा. सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. २८ फेब्रुवारी २०२४ च्या सुनावणीनंतर मा. सुप्रीम कोर्टाने निकाल राखून ठेवलेला आहे, असे असतानाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी निकाल लागलेला आहे, असे खोटे सांगून जनतेची दिशाभूल केली आहे, असा आरोप अतुल लोंढे यांनी केला आहे.