इंजिनचालकाचा रेल्वे पुढे नेण्यास नकार ; बल्लारशा- गोंदिया ट्रेन 5 तास रखडली
गोंदिया. – Gondia मालगाड्यांना प्राधान्य दिले जात असल्याने रेल्वे गाड्यांचे वेळापत्रक पूर्णपणे विस्कळित झाले आहे. याच प्रकाराला कंटाळून गुरुवारी सकाळी नवेगावबांध (Navegaonbandh) (देवलगाव) रेल्वे स्थानकावर रेल्वे ट्रॅकवर उतरुन प्रवाशांनी संताप व्यक्त केला. गोंदिया –बल्लारशा ट्रेनला (Gondia – Ballarsha train) विलंब झाल्याने हा प्रकार घडला होता. त्यानंतर हीच गाडी परतीच्या प्रवासाला निघाली. पुन्हा वाटेत विलंब होत गेला. तब्बल पाच तास उशीराने ही गाडी हिरडामाली (hirdamali) रेल्वे स्थानकावर रात्री पोहचली. पण, लोकोपायलटने या रेल्वे स्थानकावरुन गाडी पुढे नेण्यास नकार दिला. यामुळे रेल्वे प्रशासनापुढे पेच निर्माण झाला. तर प्रवासीही तातकळत बसून होते. प्रवाशांचे आंदोलन समजण्यासारखे आहे. पण, इंजिन चालकाने गाडीच पुढे घेऊऩ जाण्यास नकार देणे हा अभावानेच घडणारा प्रकार आहे. लोको पायलटसाहेब हे वागणं बरं नव्हं, अशी भावना प्रवाशांमध्ये उमटली.
मालगाड्यांसाठी प्रवासी गाड्यांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे या प्रकाराने आता प्रवाशांसह लोकोपायलटसुद्धा त्रस्त झाले असल्याचा अनुभव गुरुवारी प्रवाशांना आला. बल्लारशाहून गोंदियाला येणारी पँसेजर गाडी ही तब्बल पाच तास उशीराने धावली. त्यामुळे अनेक प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पोहचण्यासाठी मानसिक त्रास सहन करावा लागला.दरम्यान गाडी हिरडामाली रेल्वे स्थानकावर रात्री ७.३० वाजताच्या सुमारास पोहचल्यानंतर त्या ठिकाणी एक तास उभी ठेवण्यात आली. त्यानंतर गाडीच्या लोकोपायलटने गाडी पुढे नेण्यास नकार दिला. तो आपल्या मागणीवर अडून बसला होता. त्यामुळे प्रवाशांना हिरडामाली स्थानकावर मनस्ताप सहन करावा लागला. रेल्वेच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा लोकोपायलटची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. बऱ्याच विनवण्यांनंतर लोकोपायलट तयार झाला. ही गाडी रात्री ९ वाजताच्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर पोहचली. गोंदियामार्गे धावणाऱ्या गाड्यांना होणारा विलंब आता नित्याचीच बाब झाली आहे. त्याचा प्रवाशांना मनस्ताप होतो आहे. दररोज ये-जा करणाऱ्या चाकरमान्यांसाठी रेल्वेचा प्रवास कंटाळवाना झाला आहे. याप्रकाराने प्रवाशांमध्ये रोष आहे. तुर्ता असे प्रसंग कमा प्रमाणात असले तरी आगामी काळात त्याची तीव्रता वाढ शकेल, असा इशारा प्रवाशांकडून दिला जात आहे.