मुंबई(Mumbai)
बहुतेक देशात सरकारी आणि खाजगी संस्थांमध्ये ८ किंवा ९ तास काम करण्याची संस्कृती आहे. मात्र इन्फोसिसचे सह-संस्थापक एनआर नारायण मूर्ती यांनी काही महिन्यांपूर्वी देशातील तरुणांनी आठवड्यातून ७० तास काम केले तर जगाच्या अर्थव्यवस्थेसोबत स्पर्धा करू शकू असं म्हटलं होतं. अवघ्या दोन-तीन वर्षांत मोठे यश मिळेल असंही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानावरुन सोशल मीडियावर बरीच चर्चा झाली होती. मात्र आता कामाच्या तासांबद्दल बोलताना लार्सन अँड टुब्रो या कंपनीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यन यांनी नारायण मूर्ती यांच्या पेक्षाही एक पाऊल पुढे टाकले आहे. कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे असा सल्ला एस एन सुब्रमण्यन यांनी दिला आहे.
नारायण मूर्ती यांनी आठवड्यातून ७० तास काम करण्याबाबत केलेल्या विधानानंतर, सोशल मीडियावर एस एन सुब्रमण्यन यांनी केलेल्या वक्तव्याबाबत चर्चा सुरु झाली आहे. एल अँड टीचे अध्यक्ष एस एन सुब्रमण्यम यांनी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातून ९० तास काम करावे असे सुचवले आहे. एल अँड टीच्या सहा दिवसांच्या कामाच्या आठवड्याच्या धोरणाबद्दल कर्मचाऱ्यांशी झालेल्या संवादादरम्यान एस एन सुब्रह्मण्यम यांनी भाष्य केलं. कर्मचाऱ्यांशी बोलताना सुब्रमण्यम यांना अब्जावधी डॉलरची कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना शनिवारीही का कामावर बोलावते असं विचारण्यात आलं होतं. त्यावर सुब्रमण्यम यांनी दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा सुरु झाली आहे.
रेडिटवर शेअर केलेल्या एका व्हायरल व्हिडिओमध्ये, सुब्रमण्यन एक बैठकीत बोलताना दिसत आहेत. “मला माफ करा मी तुम्हाला रविवारी कामावर बोलवू शकत नाही याचे मला वाईट वाटतं. जर मी तुम्हाला रविवारी कामावर बोलवू शकलो असतो तर मला जास्त आवडले असते. कारण मी रविवारीही काम करतो,” असं एस एन सुब्रमण्यम म्हणाले. कर्मचाऱ्यांनी जास्त तास काम करावं याचे एस एन सुब्रमण्यम यावेळी समर्थन करत होते.
कर्मचाऱ्यांनी सुट्टीच्या दिवशी घरी थांबण्याची कल्पना त्यांनी फेटाळून लावली आणि म्हटलं की, “तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या पत्नीकडे किती वेळ पाहू शकता? तुमची पत्नी तुमच्याकडे किती वेळ पाहू शकते? ऑफिसला जा आणि कामाला लागा “. त्यामुळे सुट्टीच्या दिवशी कर्मचाऱ्यांनी ऑफिसमध्ये येऊन काम करावे असा सल्ला त्यांनी पुढे दिला.
आपलं म्हणणं मांडण्याठी सुब्रमण्यन यांनी एका चिनी व्यक्तीशी केलेल्या संभाषणातील एक किस्सा यावेळी सांगितला. “त्या व्यक्तीने असा दावा केला की चीन अमेरिकेला मागे टाकू शकतो कारण चिनी कामगार दर आठवड्याला ९० तास काम करतात तर अमेरिकन ५० तास काम करतात. त्यामुळे तुमच्यासाठी हेच उत्तर आहे. जर तुम्हाला जगात अव्वल स्थान मिळवायचे असेल, तर तुम्हाला आठवड्यातून ९० तास काम करावे लागेल. मित्रांनो, चला कामाला लागा,” असं एस एन सुब्रमण्यम म्हणाले.
दरम्यान, रेडिटवरचा हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर अनेक युजर्सनी त्याच्यावर नापसंती दर्शवली. एका युजरने सुब्रह्मण्यम यांची तुलना इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांच्याशी केली. काही युजर्संनी सुब्रह्मण्यम यांच्या वर्क लाईफ बॅलन्सच्या समजुतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तर काहींनी अतिकामाला प्रोत्साहन देण्याच्या व्यापक संस्कृतीवर टीका केली आहे. अनेकांना वाटले की त्यांच्या वक्तव्यामुळे कर्मचाऱ्यांचे वैयक्तिक जीवनाचे मुल्य क्षुल्लक आहे. आणखी एका युजरने मला वाटले की एल अँड टी ही एक चांगली कंपनी आहे पण असं दिसतय की प्रत्येकजण नारायण मूर्तीच्या पावलावर पाऊल ठेवत आहे, असं म्हटलं.