
महाकुंभप्रयाग योग नागपूरकरांसाठी ठरला प्रयागराज योग
नागपूर (NAGPUR) , १६ फेब्रुवारी, महाकुंभ मेळा हा सनातनच्या एकतेचा योग असल्याचे विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्संग फाऊंडेशन संयोजित आणि व्हॅल्युएबल ग्रुप तर्फे आयोजित ‘’महाकुंभप्रयाग योग’’ सोहळ्यात केले. नागपूर येथील रेशीमबाग मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. जगाच्या पाठीवर आस्थेचा एवढा भव्य संगम आजवर कोणत्याही देशाने बघितला नाही. भारतीय संस्कृती आणि सभ्यतेमुळे हजारो वर्षांपासून हा संगम सनातन धर्माला मानणाऱ्या प्रत्येक घटकांना जात, धर्म, भाषा, पंथ विसरून एकत्रित आणत दिव्य अनुभव देतो, असेही ते म्हणाले.
प्रयागराज येथील महाकुंभमेळ्यात ज्या नागरिकांना त्रिवेणी संगमावर पवित्रस्नानाचा लाभ घेता आला नाही त्या नागरिकांकरिता हा विशेष पर्वणी सोहळा आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त प्रयागराज संगमाचे हजारो लिटर पवित्र जल नागपूरमध्ये आणण्यात आले होते. व्हॅल्युएबल ग्रुपचे अमेय हेटे यांच्या वडिलांच्या संकल्पनेतून शनिवार १५ फेब्रुवारी आणि रविवार १६ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलेला हा दोन दिवसीय पवित्र उत्सव नागपूरकरांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम, भक्ती संगीत, सत्संग, कीर्तन, भजन आणि प्रवचनाची पर्वणी घेऊन आला असल्याचे विधान देवेंद्र फडणवीस यांनी केले.
या सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, शनिवार १५ फेब्रुवारीला पहाटे श्रीगुरुपादुका दर्शन व संगम जल अभिषेक सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी गजानन महाराज मंदिर चौक ते रेशीमबाग मैदान या भव्य मार्गावर निघालेली पादुकांची रथयात्रा व सत्संग फाऊंडेशनचे संस्थापक आणि अध्यात्मिक गुरु पद्मभूषण श्री एम यांच्या आशीर्वचनाने भाविकांना मंत्रमुग्ध केले. भाविकांची शनिवारची सांयकाळ सुप्रसिद्ध गायक कैलास खेर यांच्या भक्तिसंगीताच्या कार्यक्रमात न्हाऊन निघाली.
– व्हॅल्युएबल ग्रुप आणि सत्संग फाऊंडेशनतर्फे आयोजन
या कार्यक्रमासोबतच महाराष्ट्रातील विद्वान ब्रम्हवृंदांद्वारे ”शिवशक्ती याग”, संतांच्या पादुका व जलकुंभ अभिषेक, पवित्र जलाभिषेक इत्यादी कार्यक्रमसुद्धा आयोजित करण्यात आले होते. आधुनिक तंत्राच्या साहाय्याने उपस्थित भाविकांवर प्रयागराजच्या पवित्र तीर्थजलाचा वर्षाव करण्यात आला. या पवित्र सोहळ्यास व आयोजित महाआरतीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नागपूर महानगर संघचालक राजेशजी लोया देखील उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांचे देखील या कार्यक्रमास विशेष सहकार्य लाभले.
व्हॅल्युएबल ग्रुपचे संचालक अमेय हेटे यांनी संगमाचे प्रतीक असलेला गंगाजलाचा पवित्र कलश देत देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत आणि सत्कार केला. तर, महाकुंभाचा दिव्य योग आयोजकांनी नागपूरकरांना घरबसल्या दिल्याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी अमेय हेटे, नरेंद्र हेटे व सर्व आयोजकांचे आभार मानले. गुरुदेव श्री एम यांच्या सानिध्यात चालणारे सत्संग फाउंडेशन आणि त्याचे काम पाहणारे मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश व राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सुनील शुक्रे यांचे देखील त्यांनी आभार मांडले. भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या दिव्य स्नानाची अनुभूती घ्यावी असे आवाहन आयोजकांच्या वतीने नरेंद्र हेटे, अमेय हेटे आणि मंजिरी हेटे यांनी केले होते.