एमआरएफ’ च्या शेअरनं रचला इतिहास, १ लाख पार!

0

मुंबई: टायर बनविणाऱ्या ‘एमआरएफ’ कंपनीने मंगळवारी इतिहास रचला. या कंपनीच्या शेअरचे मूल्य एक लाख रुपयांवर गेले असून एक लाखाचा टप्पा ओलांडणारा हा भारतातील पहिलाच स्टॉक आहे. ‘एमआरएफ’च्या शेअर्सच्या किमतीत मंगळवारी 1.37 टक्क्यांनी वाढ झाली असून (Historic MRF Share Price) त्याची किंमत एक लाख 300 वर गेली होती. दरम्यान, सेन्सेक्सने देखील मंगळवारी पुन्हा एकदा ६३ हजारांचा टप्पा ओलांडला.

शेअर बाजारातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाच्या किंमतीत सातत्याने घट होत असल्याने टायर कंपन्यांच्या शेअर्समध्ये तेजी आली आहे. त्याचा फायदा ‘एमआरएफ’ला झाला आहे. हा स्टॉक मंगळवारी बीएसईवर 99,500 वर उघडला होता. त्यानंतर सकाळच्या सत्रातच या स्टॉकने 1,00,300 रुपये इतका सर्वकालीन उच्चांक गाठला. एक लाख रुपयांचा आकडा गाठणारा हा भारतातील पहिलाच स्टॉक ठरला आहे. मागील वर्षभरात सेन्सेक्समध्ये 19 टक्क्यांची वाढ झाली असताना या वाढीच्या तुलनेत हा शेअर 45 टक्क्यांनी वधारला आहे. गेल्यावर्षी जून महिन्यात एमआरएफचा शेअर्सने बीएसईवर 65,900 रुपये इतकी निचांकी पातळी गाठली होती. तर जानेवारी २०२१ मध्ये हा शेअर प्रथमच ९० हजारांवर पोहोचला होता.