नवी दिल्ली- ऑनलाईन व्हिडिओ गेम्सचे अतिशय गंभीर दुष्परिणाम पुढे येत आहेत. केंद्र सरकारने ऑनलाईन व्हिडिओ गेम्सविरुद्ध कठोर पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. (Online Video Games)सट्टेबाजीला प्रोत्साहन, सवय लावणाऱ्या तसेच नुकसानकारक ऑनलाईन गेम्सवर अंकूश लावण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्यासाठी लवकरच कारवाई सुरु होणार आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाचे केंद्रीय मंत्री राजीव चंद्रशेखर (IT Minister Rajeev Chandrasekhar) यांनी ही घोषणा केली आहे. ऑनलाईन गेमिंगमुळे लहान मुले, तरुणांसह प्रौढ नागरिकांवरही दुष्परिणाम होत असल्याचे निरीक्षण नोंदविले गेले आहे.
मागील काही वर्षांपासून ऑनलाईन व्हिडिओ गेम्सने लहान मुले व तरुणाईला अक्षरशः वेड लावले आहे. मात्र, काही गेम्स सट्टेबाजीला प्रोत्साहन देत असल्याचे आढळून आले आहे.
ऑनलाईन गेमिंगमध्ये लहान मुले आपल्या आईवडिलांच्या खात्यातून मोठी रक्कम उडवून लावतात. चीनमध्ये ऑनलाईन गेमिंगमध्ये एका मुलीने आपल्या आईच्या खात्यातून ५२ लाख रुपये गमावल्याची घटना जगभर गाजली. तर गेमिंगच्या सट्टेबाजीत आर्थिक फटका बसल्याने अनेक तरुणांनी आत्महत्या केल्याचे प्रकार भारतात घडले आहेत. या प्रकारांना आळा घालण्यासाठी सरकार नुकसानकारक ठरणाऱ्या गेमिंग अॅपवर प्रतिबंध घालण्याचा विचार करीत आहे. अलिकडेच या ऑनलाईन गेमिंग अॅपच्या माध्यमातून मुलांचे धर्मांतर करण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. लहान मुलांना हरवून आणि त्यांचे ब्रेनवॉश करून त्यांना धर्मांतर करण्यासाठी बाध्य करणाऱ्या टोळीचा गाझियाबाद पोलिसांनी अलिकडेच पर्दाफाश केल्याचे उघडकीस आले आहे. केंद्रीय मंत्री चंद्रशेखर यांच्यानुसार, मोबाईल व्हिडीओ आणि ऑनलाईन गेमिंगच्या दुष्परिणामाबाबत सरकारकडे अनेक तक्रारी आल्या आहेत. या तक्रारींची दखल घेत सरकारने तीन प्रकारच्या ऑनलाईन गेमवर प्रतिबंध घालण्याची तयारी सुरू केली आहे. यातील पहिला प्रकार सट्टेबाजीशी संबंधित गेम्स, दुसरा प्रकार खेळाचे व्यसन लावणारे गेम्स तर तिसरा प्रकार देशाची एकता आणि अखंडता धोक्यात आणणाऱ्या गेम्सचा असून या तिन्ही प्रकारच्या गेम्सवर प्रतिबंध घातला जाणार असल्याचे चंद्रशेखर यांनी सांगितले. मागील दहा वर्षात देशात ऑनलाईन गेमिंगच्या बाजारपेठेत दहापटीने वाढ झाली आहे.