शेती,शेतकरी आणि त्याच्या पदरात पडणाऱ्या उत्पन्नाचा विचार केल्यास गेल्या दोन दशकात निसर्गावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला जश्या सगळ्या यंत्रणा ठेवून लुबाडतात तसाच प्रयत्न सतत चार पाच वर्षांपासून निसर्ग करीत असल्याचे लक्षात आले आहे. जणू काही निसर्ग शेतकऱ्याला ठरवून टार्गेट करीत असल्यासारखा वागत आहे. हातातोंडाशी आलेला घास पळविण्याचे भयंकर षडयंत्र शेतकऱ्याच्या बाबतीत होताना दिसत आहे. सरकारने तर त्याला कधीच वाऱ्यावर सोडले आहे अशावेळी ज्या निसर्गावर त्याची भिस्त होती तो सुद्धा बेईमान झाल्यामुळे शेतकऱ्याचा कुणी वाली राहिला आहे असे म्हणायचे धाडस होत नाही. उन्हाळ्यात अवकाळी पावसाने उन्हाळी पिके आणि फळबागा नेस्तनाबूत झाल्या आहेत. राजकीय पक्ष सत्तेच्या खेळात मश्गुल असल्याने एकेका शेतकऱ्याची मोडलेली कंबर बघायला कुणालाही वेळ नाही. सगळेच किसानपुत्र आहेत पण किसानी कुणाच्या रक्तात शिल्लक नाही.
निसर्गाचा समतोल बिघडल्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. ऐन उन्हाळ्यात पिकांची काढणी सुरू असताना वादळी वाऱ्यांसह गारपीट झाली. त्यामुळे काढणीला आलेल्या आणि काढणी झालेल्या पिकांचे मोठे नुकसान झाले. नगर जिल्ह्यात अनेक ठिकाणी शनिवारी सायंकाळी आणि रात्री गारपीट झाली. शेतात आणि रस्त्यांवरही गारांचा खच पडला होता.
हवामान विभागाने गारांसह पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला होताच, तो खरा ठरला. आधीच करोनामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना या दुसऱ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. वऱ्हाडातील अकोला,बुलडाणा,वाशीम,यवतमाळ ,अमरावती या भागात आज दिवसभर तुफान पाऊस झाला. अनेक ठिकाणी गाराही पडल्या. यामुळे डाळिंब, गहू, हरभरा, भाजीपाल्यासह आंब्याचे मोठे नुकसान झाले. पावसामुळे शेतीचही मोठे नुकसान झाले, तर काही ठिकाणी घरांचीही पडझड झाली आहे.
अनेक ठिकाणी सुमारे अर्धातास गारांचा पाऊस सुरू होता. हरभऱ्याच्या आकाराएवढ्या गारा बरसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.सध्या अनेक ठिकाणी गव्हाची काढणी सुरू आहे. शेतात काढून ठेवलेल्या पिकाचे आणि काढणीला आलेल्या उभ्या पिकाचे यामुळे नुकसान झाले. पावसात भिजलेला गहू आता पांढरा पडण्याची शक्यता असल्याने त्याला भाव कमी मिळणार आहे. फळबागांचे नुकसान झाले आहे. आंब्याला आलेला मोहर वादळ आणि गारांमुळे गळून पडला आहे. डाळींब, द्राक्ष या पिकांचेही नुकसान झाले. गेल्या वर्षी अतिवृष्टीनंतर झालेल्या नुकसानीचे पंचनामे झाले होते, त्याची नुकसानभारपाईही अनेक शेतकऱ्यांना अद्याप मिळाली नाही. त्यातच आता पुन्हा नव्याने नुकसान झाले आहे. सतत होणार पाऊस ही नैसर्गिक आपत्ती जरी शासनाने जाहीर केली असली तरी त्याचा योग्य मोबदला देण्याची व्यवस्था जोवर खालच्या पातळीवर तयार होत नाही तोवर शेतकऱ्यांना दिलासा मिळणार नाही.
कोरोनाच्या काळात देशाच्या अर्थव्यवस्थेला शेतीनेच तारल्याचे आढळून आले. असे असले तरी या काळात शेतीवर अनेक नैसर्गिक संकटे येऊन गेली. अवकाळी पाऊस, वादळ, अतिवृष्टी आणि आता गारपीट यामुळे शेतीचे प्रत्येक हंगामात मोठे नुकसान होत आले आहे. कोरोनाच्या संकटाकडे दुर्लक्ष करीत शेतकरी शेतात राबवत आहे. मात्र, दर हंगामात पीक काढणीला आले की असे संकट येत असल्याचा अनुभव येत असल्याने शेतकऱ्यांमध्ये निराशा पसरली आहे.योग्य वेळी आंब्याला मुबलक बहर आला मात्र अवकाळी गारपीट येऊन सारा सत्यानाश केल्याचे चित्र सगळीकडे दिसत आहे. भाजीपाला आणि फळबागातील उत्पन्न शेतकऱ्याचे येणारे वर्ष चालवत असते ,त्याच्या आधारावर कुटुंबातील आर्थिक भार त्याचा हलका होत असतो मात्र आता त्याचीही शास्वती राहिली नसल्याने हा पोशिंदा मोठ्या संकटात सापडला आहे. राजकीय नेते आणि पक्ष त्याचे गुणगान करून थकत नाहीत अन हातात काही देत नाहीत.
सिबिल नावाचा वरवंटा आधीच त्याच्या छाताडावर सरकारने आणून ठेवला आहे त्यामुळे त्याला मिळणाऱ्या पीककर्जाच्या वाटेत अडथळे निर्माण झाले आहेत. सावकार आधीच शिरजोर होऊन वसुलीसाठी घरात डोकावून बघू लागले आहेत ,डोळ्यासमोर उध्वस्त होणारे पीक आणि मायबाप सरकारने जगण्याचे बंद केलेले सगळे रस्ते यातून मार्ग कसा काढावा हे काही सुचत नाही. हातपाय बांधून सरकार शेतकऱ्याला धावण्याच्या शर्यतीत जुंपत आहे आणि मेरिटमध्ये येण्याची अपेक्षा करीत आहे हे पुतना मावशीचे प्रेम उघडे पडले आहे. शेती,माती अन शेतकरी जगला पाहिजे असे दुर्दैवाने कुणालाही वाटत नाही कारण तो जगला तर त्याच्या मागण्यांची मारुतीची शेपटी लांबतंच जाणार आहे याची अनामिक भीती सत्तेला आणि मंत्रालयाच्या वातानुकूलित कक्षात बसलेल्या ऐतखाऊ बाबूंना आहे. अशावेळी पोटापुरते पिकवून शहरांच्या पोटाला चिमटा घेण्याचे धाडस एकदा तरी शेतकऱ्यांनी दाखवण्याची गरज आहे.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
-9892162248