४० वर्षांपूर्वीचे थकित बिल..

0

 

काँग्रेस १ कोटी जमा करणार!

नवी दिल्ली NEW DELHI  : इंदिरा गांधी Indira Gandhi  पंतप्रधान असताना उत्तर प्रदेशात राजकीय सभांना कार्यकर्त्यांची ने-आण करण्यासाठी काँग्रेसने राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांचा मोफत वापर केला होता. आता इतक्या वर्षानंतर हे प्रकरण काँग्रेसवर शेकले असून सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात तुर्तास १ कोटी रुपयांची रक्कम भरण्याचे निर्देश काँग्रेस पक्षाला दिले आहेत. न्या. सूर्यकांत आणि न्या. के. व्ही. विश्वनाथन यांच्या पीठाने उत्तर प्रदेश काँग्रेसच्या याचिकेवर सुनावणी घेत उत्तर प्रदेश राज्य परिवहन महामंडळाला नोटिस जारी केली व काँग्रेसला १ कोटी रुपये जमा करण्यासाठी चार आठवड्यांचा अवधी देण्यात आला आहे.

उत्तर प्रदेश काँग्रेसकडून १६ जानेवारी १९८१ रोजी किसान रॅलीचं आयोजन करण्यात आले होते. या रॅलीसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्यांमार्फत कार्यकर्त्यांना आले गेले होते. तेव्हाचे बिल ६ लाख २१ हजार रुपये झाले होते. काँग्रेस पक्षाने ते भरलेच नाही. १९८४ मध्ये पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात त्यांच्या अस्थी दर्शनासाठी ठेवण्यात आल्या होता. कार्यकर्त्यांना अस्थींचे दर्शन घेता यावे, यासाठी राज्यभरातून राज्य परिवहन महामंडळाच्या बसगाड्या लावण्यात आल्या व त्याचे बिलही ८.६९ लाख रुपये करण्यात आले होते. या दोन्ही बिलांचा आकडा आता व्याजासह २.६८ कोटी रुपयांच्या घरात पोहोचला.

प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचले. काँग्रेसच्या वतीने युक्तिवाद करताना सलमान खुर्शिद यांनी न्यायालयात सांगितले की, एकूण २.६८ कोटी रुपयांची रक्कम वादग्रस्त आहे. त्यावर पैशांच्या आकड्याला विरोध करण्यासाठी तुम्ही एक खटला दाखल केलात तर त्याचा निकाल लागण्यास २० ते ३० वर्षांचा अवधी लागेल. त्याऐवजी आम्ही याचिकाकर्त्यांची नेमकी देय रक्कम निश्चित करण्यासाठी एक मध्यस्थ नेमण्याचा विचार करत असल्याचे न्यायालयाने सांगितले. खुर्शीद यांनी पीठाच्या सुचनेबद्दल सहमती दर्शवली. त्यानंतर न्यायालयाने काँग्रेसला १ कोटी रुपये जमा करण्याचे निर्देश दिलेत. त्यासाठी चार आठवड्यांचा अवधी देण्यात आलाय.