पंतप्रधान मोदी आता एनडीएच्या खासदारांना भेटणार

0

नवी दिल्ली-लोकसभा निवडणुकीसाठी विरोधकांची इंडिया ही आघाडी सक्रीय झालेली असताना आत एनडीए ने देखील तयारी सुरु केली आहे. या तयारीचा भाग म्हणून पंतप्रदान नरेंद्र मोदी हे येत्या दहा दिवसात एनडीएच्या ४०० वर खासदारांची भेट घेणार आहेत. अलिकडेच एनडीएला २५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ३९ पक्षांची बैठक पार पडली आहे. पंतप्रधान मोदी आणि खासदारांमध्ये होणाऱ्या या बैठकीची तयारी केंद्रीय मंत्री संजीव बालयान, बीएल वर्मा, धर्मेंद्र प्रधान आणि शांतनु ठाकुर करीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
सुरवातीला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ३१ जुलै रोजी उत्तर प्रदेशच्या कानपूर, बृज, बुंदेलखंड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि ओडिशा येथील खासदारांना भेटणार आहेत. ८३ खासदारांसोबतची ही भेट दोन टप्प्यात होणार असून या बैठकीत भाजपचे अध्यक्ष जे.पी. नड्डा, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे देखील उपस्थित राहू शकतात. महाराष्ट्रासह राजस्थान आणि गोव्यातील ७६ खासदारांना पंतप्रधान ८ ऑगस्टला भेटणार आहेत. इशान्येकडील ३१ खासदारांना भेटीची तारीख देखील लवकरच निश्चित केली जाणार आहे. या बैठकांमध्ये खासदार आपआपल्या प्रदेशातील काम आणि केंद्रीय योजनांच्या स्थितीची माहिती देतील. आगामी लोकसभा निवडणुकीत ५० टक्के मतांचे लक्ष्य भाजपने ठेवले आहे.