रामटेक मध्ये ‘राम महोत्सव’ होणार – फडणवीस

0

दरवर्षी 22 जानेवारीला रामटेक मध्ये ‘राम महोत्सव’ होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
• महासंस्कृती महोत्सवाचा तिसरा दिवस हंसराज रघुवंशी यांनी गाजवला

 

नागपूर /रामटेक : 500 वर्षांच्या संघर्षांनंतर प्रभू श्रीरामलला अयोध्येत विराजमान होत असून या महत्वाच्या प्रसंगी राज्यभरात महासंस्कृती महोत्सवाचे आयोजन व्हावे असा आमचा मानस होता. यालाच परंपरेचे स्वरूप देत दरवर्षी 22 जानेवारीला रामटेक मध्ये ‘राम महोत्सव’ होणार अशी महत्वाची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज रामटेक मध्ये केली. सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीने व जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने आयोजित पाच दिवसीय महासंस्कृती महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमाच्या आधी ते उपस्थितांना संबोधित करीत होते. यावेळी मंचावर आमदार आशीष जैसवाल, खासदार कृपाल तूमाने, अतिरिक्त अतिरिक्त जिल्हाधिकारी आशा पठान, उपविभागीय अधिकारी रामटेक- वंदना विराणी, तहसीलदार रामटेक- हंसा मोहने यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

प्रत्यक्ष श्रीरामांच्या पदस्पर्शाने पवन झालेल्या रामटेक मधून महोत्सवाची सुरवात होणे ही आनंदाची बाब असल्याचे सांगत दर वर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या महोत्सवात प्रभू श्रीराम आणि भारतीय संस्कृति संबंधित कार्यक्रम घेण्यात येतील असे फडणवीस म्हणाले. गडमंदिराला जेवढा निधी लागेल तेवढा निधी राज्य सरकारच्या वतीने देण्यात येईल अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली. यावेळी फडणवीस यांनी ‘जयश्रीरामाचा’ जय घोष केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक आशिष जैसावाल यांनी केले. राज्याचा पहिला महासंस्कृती महोत्सव रामटेक मध्ये घेण्यासाठी फडणवीस यांचे सहकार्य लाभल्याची माहिती त्यांनी दिली. यावेळी रामटेक विषयक अनेक मुद्यांवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. प्रभू रामांच्या मंदिराचा कायापालट करण्यासाठी पुरेसा निधी मिळावा अशी मागणी जैसवाल यांनी केली. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन उपविभागीय अधिकारी ऊयाणणी केले.

रामटेकच्या गडमंदिरात पूजा: रामटेकच्या गडमंदिरात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पूजा अर्चना संपन्न झाली. अयोध्येला रामलला प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पूर्वसंध्येला हा योग जुळून येणे रामटेककरांसाठी पर्वणी ठरली.

निःशुल्क प्रवेश : 19 ते 23 जानेवारी दरम्यान रामटेक येथील नेहरू मैदानावर होत असलेल्या या पाच दिवसीय महोत्सवात गीत, संगीत, नाट्यकलेची रसिकांना अनुभूती मिळत आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या कलाकारांच्या सहभाग या महोत्सवात आहे. पाचही दिवसाचा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार असून प्रथम येणाऱ्याला प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. जास्तीत जास्त रसिकांनी या महोत्सवाला उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

आजचा कार्यक्रम : 22 जानेवारी – रामटेकवर आधारित ‘सिंधुरागीरी’ महानाट्य

चौकट : विख्यात गायक हंसराज रघुवंशी यांच्या ऊर्जामय स्वराने रामटेककर भारावले
ओम नमो शिवाय, जय श्रीराम, हर हर महादेव या आणि अश्या अत्यंत ऊर्जावान गीतांनी विख्यात गायक हंसराज रघुवंशी यांनी रामटेककरांवर मोहिनी घातली. ‘शिव समाये मुझमे मै शून्य हो रहा’, ‘वो ही है हर एक रूप मे’, रघुपति राघव राजा राम पतीत पावन सीता राम’ भजनावर भक्त मंडळी टाळ्यांची दाद देताना दिसून आली. यावेळी सर्व प्रेक्षक श्रोते- ‘राम सिया राम’चा जप गीतासोबत करीत होते. ‘अयोध्या आये मेरे राम, बोले राम सिया राम’, ‘आखो के तारे है प्रभू श्री राम’ याने रामटेक मध्ये अयोध्या अवतरल्याचे चित्र होते.