“शंकराचार्यांचे योगदान कमीच..” : सदानंद मोरे

0

पुणे PUNE – “हिंदू धर्म टिकवण्यात शंकराचार्यांचा वाटा फार कमी आहे. त्याचे काय योगदान आहे. महाराष्ट्राचा विचार केला तरीही ही गोष्ट लक्षात येते”, असे स्पष्ट मत संत साहित्याचे गाढे अभ्यासक, Senior thinker Sadanand More ज्येष्ठ विचारवंत सदानंद मोरे यांनी व्यक्त केले आहे.

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या मुद्यावर शंकराचार्यांनी घेतलेल्या भूमिकेवर वाद सुरु असल्याच्या पार्श्वभूमीवर मोरे यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. “संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज हे कुठल्या पीठाशी संलग्न होते? एकाही नाही.

चैतन्य प्रभूंनी बंगालमध्ये केवढं काम केलेय. ओरिसात गेल्यावर हीच बाब आढळते. संत निर्माण झाले म्हणून आपला धर्म टिकला, हे माझं स्पष्ट मत आहे. कारण इतिहास पाहिला तर आपल्याला हेच दिसते”, असेही मोरे म्हणाले.

मोरे यांनी सांगितले की, “आद्य शंकराचार्यांनी आठव्या शतकात वैदिक धर्म म्हणजेच आपला हिंदू धर्माचं संरक्षण केले. त्यांनी अंतर्गत वाद संपविले. वैदिक धर्माचा प्रतिस्पर्धी धर्म होता तो म्हणजे बौद्ध धर्म. त्यापासून बचाव करण्याची गरज होती. काही गोष्टी अशा असतात ज्या इतरांकडूनही घेता आल्या पाहिजेत. आपल्या धर्मात अशी कुठली गोष्ट आहे? ज्याची उणीव भासते आणि लोक दुसरीकडे वळतात. त्यामुळे तिथल्या गोष्टी चांगल्या असतील तर त्या सुद्धा घ्यायला हरकत नाही, अशा एका व्यापक दृष्टीकोनातून :शंकराचार्यांनी कार्य केलं.

ते कार्य एककेंद्री होऊ नयेत म्हणून त्यांनी चार पीठे स्थापन केली. देशातल्या चार दिशांना ती पीठे आहे. त्यात उपपीठेही आहेत. श्रेष्ठ कोण यांचा वाद अधूनमधून सुरु असतात”, असेही मोरे यांनी सांगितले.

मोरे यांनी सांगितले, पुढच्या काळात हिंदू धर्मातून बाहेर गेलेल्या लोकांना पुन्हा धर्मात घ्यायचे की नाही? असे मुद्दे उपस्थित झाले होते. त्याची सुरुवात छत्रपती शिवरायांनी केली. नेताजी पालकरांना छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा धर्मात घेतले. संभाजी महाराजांनीही लोकांना धर्मात घेतले. ब्रिटिश काळात विवेकानंद होते, इतर विचारवंत निर्माण झाले. चळवळी निर्माण झाल्या. पतित परावर्तन वगैरे गोष्टी निर्माण झाल्या, ज्यात धर्माबाहेरच्या लोकांना धर्मात घेतले जात होते. त्यातही कुठेच शंकराचार्यांचा वाटा दिसत नाही.” असेही ते म्हणाले. मोरे म्हणाले, शंकराचार्य हे व्यापक स्तरावर कुठेही दिसत नाहीत. अस्पृश्यांना परत घ्यायचं की नाही? या सगळ्या गोष्टींमध्ये शंकराचार्य पडले नाहीत. ते फक्त धर्माला चिकटलेलेच राहिले. हिंदू धर्म हा कडवट धर्म नाही, दुसऱ्याच्या अंगावर चालून जाणारा धर्म नाही. माझ्यापुरते विचाराल तर मी धर्मनिरपेक्ष आहे. मी का धर्मनिरपेक्ष आहे तर मी हिंदू आहे म्हणून धर्मनिरपेक्ष आहे” असेही मोरे म्हणाले.