स्व. डॉ.अ.ना.देशपांडे स्मृती व्याख्यानमाला संपन्न

0

 

प्रभू श्रीराम नवभारताच्या सांस्कृतिक व सामाजिक उत्थानाचे प्रेरक आदर्श – अमर कुळकर्णी

नागपूर (Nagpur)दि. १२
प्रत्येक भारतीयाला राम वेगवेगळ्या अंगांनी भावतो आणि रामनामाने जीवनातली नकारात्मकताही दूर होते. परंतु रामकथेकडे आधुनिक युगातील नव्या भारताच्या राष्ट्रीय, सांस्कृतिक व सामाजिक उत्थानाचा प्रेरक आदर्श म्हणून धोरणात्मक पद्धतीने बघायला हवे, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध गायक श्री. अमर कुळकर्णी यांनी येथे केले.
स्व. डाॅ. अ.ना. देशपांडे स्मृती समितीच्या व्याख्यानमालेचे यावर्षीचे पुष्प गुंफताना ते बोलत होते. व्याख्यानमालेचे हे तिसावे वर्ष होते. विदर्भ हिंदी मोर भवनच्या सभागृहात झालेल्‍या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समितीचे अध्यक्ष श्री. श्री. म. पांडे हे उपस्थित होते तर समितीचे कार्याध्यक्ष डाॅ. वि.स.जोग, कार्यवाह डाॅ. राजेंद्र नाईकवाडे हेदेखील उपस्थित होते.
‘भारतीय संस्कृतीचा प्राणस्वर श्रीराम’ या विषयावर बोलताना अमर कुळकर्णी यांनी वाल्मिकी रामायण व रामचरितमानसातील काही प्रसंगाच्या आधारे रामकथेतील विविध आदर्शांचा विस्तृत परामर्श घेतला. रामाच्या जीवनातील विविध गुणवैशिष्ट्ये नव्या युगातही कशी प्रासंगिक आहेत ह्याची सोदाहरण चिकित्सक मांडणी कुळकर्णी यांनी भारतीय साहित्यातील विविध वचनांचा आधारे केली.

प्राचार्य पांडे यांनी भारतातील रामकथेचे महात्म्य विशद केले. अनांचे सुपुत्र माधव देशपांडे यांनी अ.ना.देशपांडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रास्ताविक डाॅ. अजय कुलकर्णी यांनी तर परिचय डॉ.ज्ञानेश्वर गहुकर ह्यांनी करून दिला. सूत्रसंचालन शलाका जोशी यांनी तर आभारप्रदर्शन डॉ. दिनेश खुरगे यांनी केले. प्रांजली अग्निहोत्री यांनी रामगीत तर डाॅ. राजेंद्र नाईकवाडे यांनी पसायदान सादर केले. आशुतोष अडोणी, डाॅ. श्यामला मुजुमदार, डाॅ. उल्हास मोगलेवार, मुकुंद पाचखेडे, अनिल देव, अजय आचार्य आदींची उपस्‍थ‍िती होती.