महिलांना योग्य संधी मिळणे गरजेचे – डॉ. कल्पना पांडे

0

ज्येष्ठ नागरिक महामंडळात जागतिक मह‍िला दिन साजरा

नागपूर, (Nagpur)13 मार्च
अनेक क्षेत्रात महिलांना वर्षोनुवर्ष पाहिजे तसा वाव मिळाला नाही. आजही त्या विशिष्ट चौकटीत जगतात. त्यांना पुढे येण्याकरिता चांगल्या संधी मिळणे गरजेचे आहे, असे मत माजी महापौर डॉ. कल्पना पांडे यांनी यावेळी व्यक्त केले.
ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भ आणि ज्येष्ठ नागरिक मंडळ हनुमाननगरतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र हनुमाननगर येथे परिसंवाद आयोजित करण्‍यात आला होता. या परिसंवादाच्‍या अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या. व्यासपीठावर ज्येष्ठ नागरिक महामंडळ विदर्भचे अध्‍यक्ष प्रभूजी देशपांडे, सचिव अ‍ॅड. अविनाश तेलंग, रमेशचंद्र बागडदेव यांची उपस्थिती होती.

कल्‍पना पांडे म्हणाल्या, आज अनेक क्षेत्रात महिला दिसतात. परंतु त्यांचे प्रमाण खूप कमी आहे. महिलांना ताठ मानेने पुढे जायचे असेल प्रोत्साहनाची गरज आहे. परिसंवादात डॉ. क्षमा केदार, संध्‍या दंडे, माधुरी साकुळकर, अ‍ॅड. स्मिता देशपांडे, डॉ. राजेश्वरी वानखेडे यांनी विविध विषयांवर विचार मांडले. कार्यक्रमाचे संचालन मंजूषा सदावर्ते यांनी, तर आभारप्रदर्शन डॉ. दीपक शेंडेकर यांनी केले. कार्यक्रमाला अविनाश जोशी, विनोद व्यवहारे आणि इतर अनेकांचे सहकार्य लाभले.