
सौर पंपांच्या तक्रारींचा जागेवरच निपटारा! महावितरणचा नागपूर जिल्ह्यात ‘अॅक्शन प्लॅन’
नागपूर(Nagpur), दि. 17 एप्रिल 2026: शेतकऱ्यांना दिवसा आणि अखंडित वीज मिळावी यासाठी ‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजना वरदान ठरली आहे. मात्र, हे सौर संच वापरताना तांत्रिक बिघाड, नैसर्गिक आपत्ती किंवा चोरी अशा समस्यांमुळे अनेक शेतकरी त्रस्त आहेत. या सर्व तक्रारींचे तातडीने निवारण करण्यासाठी महावितरणच्या नागपूर ग्रामीण मंडळाने कंबर कसली असून, येत्या 20 ते 23 एप्रिल दरम्यान प्रत्येक उपविभागिय कार्यालयात विशेष तक्रार निवारण शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे.
शेतीला रात्रीच्या वेळी सिंचन करणे कष्टाचे आणि धोक्याचे असते. यावर सौर पंप हा कायमस्वरूपी उपाय असला तरी, अनेकदा तांत्रिक कारणांमुळे पंप बंद पडणे किंवा पाणी कमी येणे अशा तक्रारी समोर येतात. माकडांचा उपद्रव किंवा नैसर्गिक संकटांमुळे पॅनेलचे होणारे नुकसान, आणि पैसे भरूनही अद्याप प्रलंबित असलेली सौर पंपांची स्थापना, यांसारख्या सर्व प्रश्नांवर या शिबिरात थेट तोडगा काढला जाणार आहे.
महावितरणचे अधीक्षक अभियंता संजय वाकोडे यांनी सांगितले की, शेतकऱ्यांचा सौर ऊर्जेवरील विश्वास वाढवण्यासाठी त्यांच्या समस्या जलद सोडवणे ही आमची प्राथमिकता आहे. या शिबिरांमध्ये महावितरणचे वरिष्ठ अभियंते, तांत्रिक कर्मचारी आणि संबंधित एजन्सींचे प्रतिनिधी प्रत्यक्ष उपस्थित राहून तांत्रिक प्रश्न जागेवरच निकाली काढणार आहेत.
शिबिरांचे वेळापत्रक (सकाळी 11 ते दुपारी 2):
• 20 एप्रिल 2026: काटोल विभागातील जलालखेडा, काटोल, कोंढाळी, नरखेड, सावरगाव उपविभाग आणि उमरेड विभागातील कुही उपविभाग.
• 21 एप्रिल 2026: मौदा विभागातील कामठी, कन्हान, मौदा, रामटेक उपविभाग आणि उमरेड विभागातील भिवापूर व उमरेड उपविभाग (उमरेड उपविभागीय कार्यालय).
• 23 एप्रिल 2026: सावनेर विभागातील कळमेश्वर, खापा, खापरखेडा, मोहपा, पारशिवनी आणि सावनेर उपविभाग.
शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना:
ज्या शेतकऱ्यांना आपली तक्रार नोंदवायची आहे, त्यांनी शिबिराला येताना आपला ‘एमटीआयडी’ (MTID) आणि संबंधित कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे. यामुळे संगणकीय प्रणालीवर माहिती शोधून तातडीने कार्यवाही करणे शक्य होईल.
प्रलंबित तक्रारी सोडवण्यासोबतच देखभाल-दुरुस्तीबाबत शंकांचे निरसन करण्याची ही मोठी संधी आहे. नागपूर ग्रामीण मंडळातील सर्व सौर कृषीपंपधारक शेतकऱ्यांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.
उपमुख्य जनसंपर्क अधिकारी,
महावितरण, नागपूर
















