नागपूर :नागपुरात गुरुवारी सायंकाळच्या सुमारास आलेल्या गारपीट, वादळी पावसाने तारांबळ उडविली. झाड भिंतीवर कोसळल्याने मायलेक अशा दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. मलब्यात दबलेल्या दोघांना काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. मृतकाचे नाव ज्योती अशोक यादव, अमन यादव असे असून मेयो रुग्णालयात नेले असता डॉक्टरानी मृत घोषित केले. गोंडवाना चौकातील जेपी हाइट्सची भिंत कोसळल्याने ही घटना घडली. सदर पोलिस, अग्निशमन जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. शहरात ठिकठिकाणी झाडे पडल्याने वाहतूक खोळंबली. अजनी रेल्वेस्थानक तासभर अंधारात होते. शहरात अजनी, लक्ष्मी नगर, मेट्रो भवन, तात्या टोपे उद्यान, अत्रे लेआउट, रिंग रोड मानेवाडा, राजनगर कोराडी रोड अशी ठिकठिकाणी झाडे पडल्याने रात्री उशिरापर्यंत झाडे कापण्याचे वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू होते. 42 अंश सेल्सिअस पर्यंत गेलेल्या नागपूरचा पारा अचानक आज ढगाळ वातावरण वादळी पावसाने खाली आला.पुढील तीन-चार दिवस नागपूर,वर्धा, चंद्रपूर असा पूर्व विदर्भात विजांचा कडकडाट, गारपीटसह वादळी पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या काळात प्रति तास 40 किमी वेगाने जोरदार वारे वाहणार असल्याने सर्वांनी खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एप्रिल महिना कडक उन्हाचा असताना सातत्याने अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान सुरू आहे