कार्यकर्त्यांच्या प्रेमाने चिंब भिजले सुधीरभाऊ!

0

 

गरीब, किसान, युवा, महिलांचा सन्मान आणि मोदींच्या संकल्पासाठी लढणार निवडणूक

चंद्रपूर, वणी, आर्णीचे नाव जगात गाजवणार

नागपूर:(Nagpur)
गेली सहा सत्र महाराष्ट्राची विधानसभा आपल्या कार्यकर्तृत्वाने गाजविणारे आमदार सुधीर मुनगंटीवार यांची यापुढील कारकीर्द देशाच्या संसदेत गाजण्याची तयारी कार्यकर्ते आणि चाहत्यांनी केव्हाच सुरू केली आहे. सुधीर मुनगंटीवार यांच्या रुपात एक दमदार नेतृत्व आता चंद्रपूर लोकसभा मतदारसंघाला लाभणार असल्याचा विश्वास कार्यकर्ते आणि चाहत्यांनी केलेल्या प्रेमाच्या वर्षावातून व्यक्त होत गेला आणि सुधीर मुनगंटीवार त्या प्रेमात चिंब भिजून गेले…

चंद्रपूर लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिल्यांदाच आगमन झाल्यानंतर आज नागपूर विमानतळावर कार्यकर्त्यांच्या भरघोस उपस्थितीत त्यांचे जल्लोषात स्वागत झाले. हार, पुष्पगुच्छांचा खच पडेल इतक्या मोठ्या संख्येत चाहत्यांनी आज त्यांच्यावर पुढील निवडणुकीसाठी शुभेच्छांचा वर्षाव केला.

यावेळी बोलताना सुधीर मुनगंटीवार यांनी, आगामी लोकसभा निवडणूक केवळ स्वतःसाठी नाही, तर गरीब, किसान, युवा, महिलांचा सन्मान आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पासाठी लढणार असल्याचे स्पष्ट केले. दिल्लीतील नवीन संसद भवनाच्या बांधकामात ज्या क्षेत्रातील लाकूड वापरण्यात आला, त्याच लाकडांच्या दारातून संसदेत प्रवेश करण्याची संधी जनतेच्या आशीर्वादाने मिळणार असेल तर तो परमोच्च आनंदाचा क्षण असेल अशी भावनाही सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केली. भारतीय संसदेत जाण्याची संधी प्राप्त झाल्यास आपण विधिमंडळाप्रमाणेच संसदेतही चंद्रपूर, वणी, आर्णीचा आवाज बुलंद करू, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.