मुंबईः शिवसेनेतील फुटीनंतर तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला होता. उद्धव ठाकरे यांनी कुणाशीही चर्चा न करता आपला राजीनामा दिला होता, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar on Uddhav Thackeray) यांनी केले आहे. एक प्रकारे पवार यांनी ठाकरेंच्या त्या निर्णयावर नाराजीच व्यक्त केली आहे. पवार म्हणाले, महाविकास आघाडी सरकार तीन पक्ष मिळून स्थापन झाले होते. त्यामध्ये जर कुणी राजीनामा देत असेल तर तो त्यांचा अधिकार आहे. पण, अन्य सहकारी पक्षांशी त्याबाबत चर्चा करणे आवश्यक होते. चर्चा न करता निर्णय घेतल्याने दुष्परिणाम होतात. दुर्दैवाने त्यावेळी ही चर्चा झाली नाही, ही वस्तूस्थिती नाकारता येणार नसल्याचे पवार म्हणाले.
मविआ सध्या तरी एकत्र
महाविकास आघाडीतील मतभेदांवर विचारले असता पवार म्हणाले, भविष्यात कोणी काय निर्णय घेईल, याबाबत आता सांगता येणार नाही. महाविकास आघाडी सध्या तरी एकत्र आहे. जे तीन पक्ष आहेत, त्यांची एकत्रित काम करण्याची मानसिकता आहे. जोपर्यंत ही मानसिकता कायम आहे, तोपर्यंत मला काळजी नाही, असे पवार म्हणाले. जर कोणी वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय घेतला तर तो त्यांचा निर्णय असेल, असे ते म्हणाले.
आघाडीच्या राजकारणात जागा वाटप, खाते वाटप या गोष्टी सहजपणे होत नाहीत. त्यात दावे होतात मात्र, चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवले जातात. मविआमध्ये जागा वाटप होईल व जागा वाटप करताना काही जागा सोडाव्या लागतील तर काही जागा या घ्याव्या लागतील. त्याला आघाडीतील लोकांची तयारी असल्याचे पवार यांनी स्पष्ट केले.
उद्धव ठाकरे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल वापरलेल्या फडतूस या शब्दावरून पवार यांनी सर्वच नेत्यांचे कान टोचले. महाराष्ट्राची ही संस्कृती नाही. वैयक्तिक टीकाटिप्पणी करु नका, असे त्यांनी नेत्यांना सुनावले.