धार्मिक स्थळांवरील गर्दी मौज ,श्रद्धा की पर्यटन ?

0

 

-पुरुषोत्तम आवारे पाटील (Purushottam Aware Patil)

लोकांचा मंदिरे, धर्म आणि बुवाबाजी कडे ओढा सतत राहावा यासाठी प्रयत्न एकदा केले की नंतर सवय होते आपले तसेच झाले आहे त्यामुळे मंदिरावर जाणारे लोंढे मौज,श्रद्धा आहे की पर्यटन हे शोधून काढण्याआधी त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. शहाणी माणसे नक्कीच तसा प्रयत्न करतील याची आम्हाला खात्री आहे.
——————————————————
ज्या देशाच्या सत्तेजवळ रचनात्मक वर्तमान आणि कल्पक भविष्यकाळ नसतो त्या देशातील राजसत्ता लोकांना काल्पनिक बाबीत गुंतवून ठेवतात त्यामुळे आस्था,श्रद्धा किंवा धर्म परायनता काहीकाळ वास्तव विसरून सत्ता हाकेल त्या दिशेने गर्दी करायला लागते त्याचा राजकीय लाभ राजसत्तेवर बसलेल्या धूर्तांना होत असतो. विचारवंत मार्क्सने जेव्हा धर्म ही अफूची गोळी असल्याचे विधान केले त्याआधी त्याने जगभरातील राजसत्तांचा आणि त्यांच्या धर्माच्या खेळांचा सखोल अभ्यास केला होता. देशातील मोठा समूह जेव्हा काल्पनिक गोष्टींच्या नादी लागतो तेव्हा त्याला वास्तवाचा विसर पडलेला असतो आणि अश्या अवस्थेत गेलेला समूह सत्ताधाऱ्यांना आपल्या इशाऱ्यावर केव्हाही नाचवता येत असतो. दिव्यशक्ती,गुरु,मोक्ष आणि धर्मासाठी बलिदान देण्याच्या प्रेरणा याच प्रक्रियेतून लोकांच्या मेंदूत टाकल्या जातात. धर्माची अशी भुरळ किंवा नशा जेवढी चढत जाईल तेवढा हा लोकांचा समूह कुणाच्या तरी आज्ञा पालन करण्यावर अवलंबून राहात असतो. नेमके हेच आपल्या देशात पद्धतशीरपणे घडवून आणले जात आहे.

आदिमानवाच्या अज्ञानातून देवांची निर्मिती झाल्याचे आजचे विज्ञान आणि मानववंशशास्त्र मानते. ज्ञानाची कवाडे जसजशी उघडली जातील तसा हा प्रकाश मेंदूवर पडून अज्ञान दूर व्हायला हवे होते मात्र त्याचे प्रमाण युरोपात झपाट्याने वाढले आणि आपला देश त्या प्रक्रियेत मागे पडला. अर्थात त्यासाठी इथल्या धर्म व्यवस्थानी जाणीवपूर्वक तसे प्रयत्न केल्याचे दिसून येते. पाच हजार वर्षांपूर्वी बौद्ध आणि चार्वाक दर्शनाने देव,आत्मा आणि पुनर्जन्म नाकारून लोकांना ज्ञानी करण्याची मोहीम उघडली मात्र तिला खीळ घालण्याचा प्रयत्न चारही बाजूनी शंकराचार्य मठांची स्थापना करून झाल्याचा आपला इतिहास सांगतो. ज्या काळात चार्वाक आणि बौद्ध मतांचा बोलबाला होता त्याच्या काही काळानंतर ही दोन्ही विचारधारा अचानक गायब कशी झाली याचा शोध घेण्याचा प्रयत्न झाल्यावर असे लक्षात आले की आपल्याला न आवडणाऱ्या विचारांना गिळंकृत करून टाकणे किंवा नष्ट करणे यालाच धर्मकार्य समजले गेले आहे.

कट टू वैदिक काळ ते वर्तमान काळ बघितला तर न आवडणाऱ्या विचारांना संपवून टाकण्याचे मूळ नेमके कुठे आहे याची माहिती मिळते. त्याही काळात समाजातला मोठा वर्ग सतत देवकार्यात , कर्मकांडात कसा गुंतवून ठेवला जाईल यासाठी पोथ्या पुराणे,शास्त्र ,वेद आणि स्मृती यांच्या निर्मितीवर भर देण्यात आल्याचे जाणवते. आजच्या काळात त्यांचे अधिक पठण करून बहुसंख्य समूहांचा मेंदू गुलाम कसा होईल याची काळजी घेतली जात आहे. आजच्या काळातील संघ परिवाराचे यच्चयावत पाईक त्या शोषक व्यवस्थेचे आधुनिक प्रतिनिधी आहेत हे लक्षात घ्यायला हवे. समाज आपल्या नियंत्रणात घ्यायचा असेल तर समाजावर संस्कार करणाऱ्या यंत्रणा ताब्यात घ्यायला हव्यात त्यासाठी पहिले टार्गेट स्त्रियांना केले गेले आणि त्यांच्या मागे व्रतवैकल्ये आणि कर्मकांडांची भलीमोठी यादी लावण्यात आली. स्त्री प्रत्येक कुटुंबातील प्रभावी वाहक आणि संस्कारपीठ असल्याने त्यातून तयार झालेली पिढी आपसूकच वैदिकांच्या वळचणीला जाऊन बसली आहे.

हजारो वर्षाच्या नियोजनबद्ध योजनेतून ज्या समूहांचे नियंत्रण केले गेले त्यांना सतत ताब्यात ठेवायचे असेल तर त्याला सतत देव, धर्माची अफू दिली पाहिजे म्हणून भारत तंत्रज्ञानात कितीही प्रगत झाला असला तरी देव, धर्माला इथल्या इस्रो प्रमुखांच्या डोक्यावर सुद्धा देवांना बसविण्यात आले आहे. समाज अहोरात्र मंदिरे आणि देवांच्या भोवती गुरफटत राहायला हवा म्हणून तर्कशुद्ध शिक्षणाला फाटा देऊन नव्याने वैदिक गुरुकुले काढण्याची भाषा केली जाते. मुस्लिमाना मदरसे अधिक मजबूत करण्यासाठी अनुदाने वाटली जातात. देशात पंचतारांकित मंदिरांची शृंखला निर्माण केली जात आहे. जप,तप ,सत्संग,अनुष्ठान, दर्शन सोहळे, दिव्यज्ञान, चमत्कार आणि योग्य परंपरा यांच्यावरील धूळ झटकून त्या झळाळीच्या आधारावर शिक्षितांना कसे आकर्षित केले जाईल यासाठी सध्याच्या काळात धर्म नावाची मोठी उद्योजक लॉबी काम करताना दिसते कारण सध्या सर्वात नफादायी व्यवस्था आणि व्यापार तोच झाला आहे.

विज्ञानाचे पदवीधर आणि तर्कशात्री जेव्हा नियमित शेगावची पायदळ वारी करताना दिसतात तेव्हा हमखास समजायला हवे की शिक्षण आणि मूर्खपणाचा संबंध कधीच संपला आहे. परवा चार पदवीधर तरुण देव दर्शनासाठी निघालेले असताना त्यांचा भीषण अपघात होऊन सगळ्यांचा मृत्यू झाला या घटनेकडे कसे बघायचे हेच समाजाला कळू नये एवढा गंज आमच्या बुद्धीवर चढवण्यात आला आहे. गेल्या दोन दशकात हजारो मंदिरे निर्माण झाली आणि भक्तांच्या संख्येत कोट्यवधीने वाढ झाली. काही हजार मंदिरे अशी आहेत की ज्यांची वार्षिक उलाढाल दहा हजार कोटींच्या वर आहे , तोंड देखलेपणासाठी काही सामाजिक किंवा आरोग्याचे उपक्रम दाखवून हा अब्जावधींचा पैसा नेमका कशासाठी वापरला जातो याचा कुणी विचार तरी केला आहे काय? पंचतारांकित मंदिरे आणि शाही बुवा,बाबा निर्माण करून त्यांच्या पंथाच्या ताब्यात देशातील जनतेला देऊन नियंत्रित करण्याचे आणि योग्यवेळी त्यांचा बिनडोक वापर करण्याचे वैदिकांचे नियोजन अजूनही आमच्या लक्षात कसे येत नाही ?

लोकांचा मंदिरे, धर्म आणि बुवाबाजी कडे ओढा सतत राहावा यासाठी प्रयत्न एकदा केले की नंतर सवय होते आपले तसेच झाले आहे त्यामुळे मंदिरावर जाणारे लोंढे मौज,श्रद्धा आहे की पर्यटन हे शोधून काढण्याआधी त्याच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. शहाणी माणसे नक्कीच तसा प्रयत्न करतील याची आम्हाला खात्री आहे.
-पुरुषोत्तम आवारे पाटील
संवाद -9892162248