सुप्रिम कोर्टाचे राहुल नार्वेकरांवर ताशेरे, वेळापत्रकही फेटाळले!

0

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे वेळापत्रक फेटाळताना मंगळवारपर्यंत नवे वेळापत्रक सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत. (Supreme Court on Maharashtra Political Crisis) सरन्यायाधीश चंद्रचूड म्हणाले की, “विधानसभा अध्यक्षांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतले पाहिजे. जूनपासून या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही. याबाबत आता सुनावणी व्हायला हवी”, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांची सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडणारे न्यायाधीश सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनाही स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. तसेच, अपात्रता प्रकरणावरील सुनावणीसाठी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी ठरवलेल्या वेळापत्रकावरही सरन्यायाधीशांनी ताशेरे ओढले आहेत. “कायदा तुम्हाला बसवून शिकवावा लागेल,” असेही न्या. चंद्रचूड सुनावणी दरम्यान म्हणाले.
“आम्ही हे जाणतो की विधानसभा अध्यक्षांचे पद हे संसदीय सरकारचा भाग आहे. त्यामुळेच आम्ही कुठलीही टाईमफ्रेम देत नाही. पण ते वेळेत निर्णय देत नसतील तर त्यांना जबाबदार धरावेच लागेल, असेही सरन्यायाधीशांनी म्हटले आहे. जर निश्चित वेळापत्रक विधानसभा अध्यक्षांकडून आले नाही, तर मात्र आम्हाला आदेश द्यावे लागतील आणि त्यानंतर ठरवून दिलेल्या मर्यादेत अध्यक्षांना निर्णय द्यावाच लागेल”, असेही सरन्यायाधीश म्हणाले.
एकत्रित सुनावणी
राष्ट्रवादी काँग्रेसचा शरद पवार गट आणि शिवसेनेचा उद्धव ठाकरे गट यांच्या आमदार अपात्रतेच्या मुद्द्यावर विधानसभा अध्यक्ष दिरंगाई करत असून सर्वोच्च न्यायालयाने हस्तक्षेप करण्याची विनंती करण्यात आली होती. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली. आजच्या सुनावणीसाठी राष्ट्रवादीकडून सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड तर ठाकरे गटाकडून अनिल देसाई सुप्रीम कोर्टात उपस्थित होते.
दरम्यान, आता मंगळवारी १७ तारखेला नवे वेळापत्रक देण्याचे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता या दोन्ही प्रकरणांसाठी अध्यक्षांना पुन्हा नव्याने वेळापत्रक द्यावे लागणार आहे.