
नाशिक NASHIK – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाशिक दौऱ्यात रोड शो केला, गोदास्नानही केले. मात्र, त्यांच्या एका फोटोची सोशल मिडियावर बरीच चर्चा होत आहे. तो फोटो म्हणजे काळाराम मंदिरातील. या सुप्रसिद्ध मंदिरात पंतप्रधान मोदी यांनी स्वच्छता मोहिम राबविली. मोदी यांनी स्वतः हातात झाडू घेऊन मंदिर परिसरात स्वच्छता मोहिम राबविली. (PM Modi in Kalaram Temple)
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आज नाशिक दौऱ्यावर होते. आपल्या नाशिक दौऱ्या दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. या रोड शोला नाशिककरांनी उत्तम प्रतिसाद दिला. तसंच त्यानंतर त्यांनी गोदावरी नदीचाच एक भाग असलेल्या राम कुंडावर जलपूजन केले. गोदावरी नदीच्या तीरावर जलपूजन करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पहिले पंतप्रधान ठरले आहेत. तसेच नाशिकच्या प्रसिद्ध काळा राम मंदिरात त्यांनी पूजा आणि महाआरती केली.
यावेळी त्यांनी स्वच्छता मोहीमही राबवली. या स्वच्छता मोहिमेचा फोटो सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावर स्वतः मोदी यांनी भाष्य देखील केले आहे. “नाशिकच्या पंचवटीत प्रभू रामचंद्रांनी बराच काळ घालवला होता. मी आज या भूमीला नमन करतो. मी आवाहन केले होते की २२ जानेवारी पर्यंत देशातल्या सगळ्या मंदिरांमध्ये स्वच्छता मोहिम राबवू. आज मी मंदिरात आलो तेव्हा मला दर्शनाचे आणि स्वच्छता करण्याचे भाग्य लाभले. आज मी पुन्हा आवाहन करतो की राम मंदिर प्राण प्रतिष्ठेच्या निमित्ताने देशातली सगळी मंदिरे स्वच्छ करावीत. प्रत्येकाने श्रमदान करावे”