Home Top News ठगबाज अजित पारसे सात महिन्यांतर गजाआड

ठगबाज अजित पारसे सात महिन्यांतर गजाआड

0

११ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी

नागपूर. उपचाराच्या नावाखाली पोलिसांना दीर्घकाळ हुलकावणी देणारा ठगबाज आणि स्वयं घोषित सोशल मीडिया विश्लेषक अजित पारसे याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. तब्बल सात महिन्यांनंतर त्याला गजाआड करण्यात पोलिसांना यश आले आहे. युनिट दोनच्या पथकाने त्याच्यावर अटकेची कारवाई केली आहे. न्यायालयाने त्याला 11 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. एकीकडे तो आजारी असून उपचार सुरू असल्याच्या बहाण्याने पोलिसांच्या चौकशीचा ससेमीरा चुकवित होता. त्याचवेळी अटकपूर्व जामिनासाठीही त्याचे प्रयत्न सुरू होते. उच्चन्यायालयाने त्याला जामीन नाकारला होता. त्यानंतर पोलिसांनी तत्परतेने कारवाई करीत अटकेची कारवाई केली आहे. विशेष म्हणजे, पारसे पोलिसांची चौकशी आणि अटकही टाळत होता. यावरून त्याला राजाश्रय असल्याच्या चर्चाही सुरू होत्या. त्याचवेळी पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते.
अजित पारसेचे अनेक कारणामे उघडकीस आले आहे. पण, वैद्यकीय महाविद्यालयाची परवानगी मिळवून देण्याच्या नावाखाली त्याने डॉक्टरची फसवणूक केली. या प्रकरणात त्याच्यावर पहिला गुन्हा दाखल झाला होता. याच प्रकरणात त्याला अटक करण्यात आली आहे.

असे आहे प्रकरण

अजित पारसे याने काही महिन्यांपूर्वी वैद्यकीय महाविद्यालयासाठी परवानगी मिळवून देण्याची थाप मारून डॉ. राजेश मुरकुटे यांची तब्बल ४. ३६ कोटीने फसवणूक केली होती. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दरम्यान चौकशीमध्ये त्याने अनेकांना सेक्सटॉर्शनच्या माध्यमातून गंडविले असल्याची बाब समोर आली होती. याशिवाय एक अन्य डॉक्टर आणि ड्रायव्हिंग स्कूलच्या संचालकाची फसवणूक केल्याचेही समोर आले. तपासात त्याने पंतप्रधान कार्यालय आणि सीबीआयचे लेटरहेड तयार केल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर हे प्रकरण तपासणीसाठी युनिट २ कडे वर्ग करण्यात आले होते. मात्र, सातत्याने आजारी असल्याची कारणे सांगून तो पोलिसांना हुलकावणी देत होता. दरम्यान त्याने अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयातही धाव घेतली होती. सत्र न्यायालयाचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यावर पारसेने उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यातही त्याने गेल्या अनेक दिवसांपासून आरोग्याचे कारण समोर करून पोलिसांना तपासात सहकार्य करीत नसल्याची बाब समोर केली होती. दरम्यान उच्च न्यायालयाने त्याची याचिका फेटाळून लावल्याने बुधवारी त्याला अटक केली. तसेच सत्र न्यायालयासमोर सादर करीत, ११ तारखेपर्यंत पोलिस कोठडी मिळविली आहे.