सुनील कुहीकर
एनआयटीच्या ( NIT ) मुद्द्यावर मुख्यमंत्री ( EKNATH SHINDE ) एकनाथ शिंदे यांचा राजीनामा मागण्याची सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सरळ सरळ धुडकावून लावल्याने संतापलेले उद्धव ठाकरे मविआची बैठक आटोपताच परतीच्या प्रवासाला निघून जाताच मनसे नेते ( RAJ THACKERAY ) राज ठाकरेंनी हिवाळी अधिवेशनाचे निमित्त साधून नागपुरात दाखल होण्याला राजकीयदृष्ट्या महत्व प्राप्त झाले आहे. प्रामुख्याने शिवसेनेवर कुरघोडी करण्याचा राज यांचा इरादा त्यामागे असल्याची राजकीय वर्तुळातील चर्चा अगदीच अनाठायी नाही, असेच मत व्यक्त होते आहे.
शिवसेनेतून बाहेर पडून एकनाथ शिंदे यांच्या गटाचे, ( BJP ) भाजपाच्या मदतीने आणि सहभागातून महाराष्ट्रात सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनेत उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेल्या लोकप्रतिनिधींची, प्रामुख्याने पक्ष पदाधिकाऱ्यांची धुसफूस सुरू झाली आहे. त्यातील अनेक नेते मनाने कधीच काॅंग्रेस , राष्ट्रवादी सोबत जाऊ शकत नाही. त्यांना शिंदेंसोबतही जायचे नाही, अशांना मनसेचा पर्याय खुला असल्याचे अप्रत्यक्ष संकेत देणे राज यांनी केव्हाच सुरू केले आहे. मनसे हा ताकदवान पर्याय असल्याचे उद्धव गटातील लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या लक्षात आणून देण्यावर पुढील काळात राज ठाकरे यांचा भर असणार असल्याचे म्हटले जात आहे.
सोबतीचा पर्याय खुला
आगामी सार्वत्रिक निवडणूक मविआच्या विद्यमान घटक पक्षांनी एकत्र येऊन लढविली तर भाजपालाही एकनाथ शिंदेंशिवाय अजून कोणाला सोबत ठेवणे गरजेचे राहू शकते. अशा स्थितीत राज ठाकरेंची मनसे मदतीला धावून येण्याची दाट शक्यता आहे. अशा त्रिकोणातून शिंदेंवर अंकूश ठेवण्यासाठीही राज यांचा उपयोग भाजपाला होऊ शकतो. उद्धव ठाकरे यांना धडा शिकविण्याशिवायचे ते एक गाठलेले टारगेट असणार आहे भाजपासाठी.
नागपुरात हिवाळी अधिवेशन सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी विधानभवन परिसराला भेट देणे, तसे नेहमीचे आहे. आदित्य तर आमदार आहेत. पण, त्यांनीही शिवसेनेच्या नेत्याच्या भूमिकेतूनच भेट दिली. या भेटीदरम्यान पक्ष कार्यकर्त्यांचा उत्साह उसने अवसान आणल्यागत होता. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी अधिवेशन काळात नागपुरात दाखल होण्याला आगळे महत्त्व राजकीय वर्तुळात दिले जात आहे.
पदाधिकाऱ्यांची नियुक्ती
या दौऱ्यात राज ठाकरे यांनी मनसेच्या 275 पेक्षा अधिक कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली. यावेळी नव्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पदाधिकाऱ्यांसाठी मनसेकडे माणसं नसल्याची चर्चा सध्या विरोधकांमध्ये सुरू आहे, यावरून राज ठाकरे यांनी जोरदार टोला लगावला आहे. विरोधकांना त्रास होणं स्वाभाविक आहे. मनसेची वाढ ही काही पक्षांच्या डोळ्यात खुपते, सुरुवातीला हसतात आणि नंतर लढायला येतात असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
राज ठाकरे यांनी नेमकं काय म्हटलं
राज ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ते मनसे पदनियुक्ती सोहळ्यात बोलत होते. मनसे पक्ष वाढत असल्याचा काहींना त्रास होतो. मनसेची वाढ ही काही पक्षांच्या डोळ्यात खुपते. विरोधकांना त्रास होणं स्वाभाविक आहे. सुरुवातीला विरोधक हसतात मग लढायला येतात. नव्या पदाधिकाऱ्यांकडून अपेक्षा आहेत, पराभवाने खचून जाऊ नका असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
महापालिका निवडणुकीची रणनिती
मुंबईसह राज्यातील काही प्रमुख शहरांच्या महापालिका निवडणुका आगामी काळात होणार आहेत. यामध्ये नागपूर महापालिकेचा देखील समावेश आहे. महापालिका निवडणुकीसाठी मनसेनं तयारी सुरू केल्याचं पहायला मिळत आहे. गेल्या तीन महिन्यांमधील राज ठाकरे यांचा हा दुसरा नागपूर दौरा आहे. महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटना मजबूत करण्यावर आणि विदर्भातील पक्षस्थिती मजबूत करण्यावर त्यांचा भर आहे, हेही यानिमित्ताने स्पष्ट झाले आहे.